कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : प्रभावी वक्तृत्वात वक्ता आणि श्रोते यांच्यातील भावनिक, बौद्धिक व सामाजिक नाते दृढ होते. विचारांची स्पष्टता, विषयाची खोली आणि मांडणीतील प्रामाणिकपणा यांमुळे श्रोते केवळ ऐकत नाहीत, तर विचार करायला प्रवृत्त होतात. त्यामुळे वक्तृत्व म्हणजे नुसते बोलणेच नव्हे तर तो श्रोत्यांच्या मनाशी केलेला एक संवाद असतो असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुण चंद्रे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या सुरेगाव कोळपेवाडी येथील राधाबाई काळे कन्या विद्यालयात कै. सौ. सुशीलामाई काळे यांचे स्मृतिप्रित्यर्थ आयोजित भव्य वक्तृत्व स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यस्थापन समितीचे अध्यक्ष कचरू कोळपे होते.

यावेळी अरुण चंद्रे यांनी सांगितले की, आजच्या बदलत्या काळात वक्तृत्वाची भूमिका अधिक व्यापक झाली आहे. भाषणातून समाजप्रबोधन, लोकशिक्षण, प्रेरणा आणि परिवर्तन घडवण्याची ताकद वक्तृत्वात आहे. श्रोत्यांच्या अपेक्षा, त्यांच्या समस्या आणि भावना समजून घेत संवाद साधला, तर शब्दांना अर्थ प्राप्त होतो आणि विचारांना दिशा मिळते. प्रभावी वक्तृत्वासाठी भाषा साधी, आशय नेमका आणि उदाहरणे समर्पक असणे आवश्यक आहे.

श्रोत्यांच्या सहभागातून संवाद द्विमार्गी झाला, की भाषण अधिक परिणामकारक ठरते. त्यामुळे वक्तृत्व म्हणजे मंचावरून केलेले एकतर्फी भाषण नसून, श्रोत्यांच्या मनाशी जोडलेला संवाद असतो. कै. सौ. सुशीलामाई काळे यांनी आपल्या स्वभावाने प्रत्येकाला आपलेसे केले होते. कर्मवीर शंकररावजी काळे यांनी घालून दिलेला समाजसेवेचा वारसा जपत त्यांनी कर्मवीर शंकररावजी काळे यांच्याकडे मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरू करण्याचा आग्रह धरला त्यामुळे राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर उभे राहिले मुलींच्या शिक्षणाची सोय झाली असून सौ.सुशीलामाई काळे कर्तृत्व, दातृत्व आणि मातृत्वाचा अनोखा संगम असल्याचे प्रतिपादन अरुण चंद्रे यांनी केले.

या कार्यक्रमासाठी मा.आ.अशोकरावजी काळे, स्थानिक स्कुल कमिटीच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे साहेब, रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभाग अध्यक्ष आ.आशुतोष काळे तसेच सर्व शालेय समित्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रवीण शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, विद्यार्थ्यांना आपले विचार स्पष्ट व परखडपणे व्यक्त करता यावेत म्हणूनच वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून हे व्यासपीठ उपलब्ध आहे. या संधीचा फायदा घेवून सर्वांनी आत्मविश्वासाने व्यक्त व्हा अशा सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळा व्यस्थापन समितीचे अध्यक्ष कचरू कोळपे यांनी स्व. सौ. सुशीलामाईंच्या आठवणींना उजाळा दिला.

याप्रसंगी संभाजीराव काळे, माजी प्राचार्य शेख सर, सुखदेव काळे, बाळासाहेब ढोमसे, सतीश नरोडे, पराग काळे, बोरावके ताई, पत्रकार तसेच रयत संकुलाचे प्रमुख प्राचार्य पी.बी.चौरे, प्राचार्या सुशीला थोरात, मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे, उपप्राचार्या नीता केदार, सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, पालक, स्पर्धक, मार्गदर्शक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक किरण चांदगुडे यांनी केले. सूत्रसंचालन स्मिता पाटील यांनी केले तर नितीन बारगळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.


