शाळा महाविद्यालय उभारण्यात कर्मवीर काळे यांचे मोलाचे योगदान – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : रयत शिक्षण संस्थेच्या शाळांच्या अडचणी सोडविण्यासाठी माजी खासदार स्व.कर्मवीर शंकररावजी काळे यांनी साखर कारखान्याच्या माध्यमातून भक्कम पाठबळ दिले. शाळांसाठी जागा, वर्गखोल्या तसेच विकासासाठी निधी उपलब्ध करून देत त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ दिले. रयत शिक्षण संस्थेच्या शाळांना ज्या ज्या वेळी अडचणी आल्या त्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे खेड्यापाड्यात शाळा-महाविद्यालय उभे राहिले आणि ग्रामीण भागात ज्ञानाची गंगा आली. रयतच्या शाळांना मा.खा.स्व.कर्मवीर शंकररावजी काळे यांनी भक्कम आधार देत खेड्यापाड्यात रयत शिक्षण संस्थेचे शाळा महाविद्यालय उभारण्यात मोलाचे योगदान दिले असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील सौ. सुशीलामाई शंकरराव काळे माध्यमिक विद्यालयातील विस्तारित दोन वर्गखोल्यांचे लोकार्पण व दोन वर्गखोल्यांच्या दुरुस्तीच्या कामाचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भोजडे येथे पूर्वी सातवीपर्यंतच शिक्षणाची सुविधा होती. माध्यमिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दहेगाव किंवा वारी येथे जावे लागत होते. विशेषतः मुलींच्या शिक्षणाची अडचण लक्षात घेऊन स्व.कर्मवीर शंकररावजी काळे यांनी १९९० मध्ये या विद्यालयाची स्थापना केली.

शाळेसाठी ८१ गुंठे जागा उपलब्ध करून देत चार वर्गखोल्या बांधून देण्याबरोबरच सौ. सुशीलामाई काळे यांच्या निधनानंतर त्यांच्या नावे असलेल्या ८ लाख ३२ हजार रुपयांच्या बचत ठेवीची  रक्कमही त्यांनी शाळेच्या विकासासाठी दिली. रयतच्या शाळांच्या अडचणी घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला स्व.कर्मवीर शंकररावजी काळे यांनी नेहमी मदतीचा हात दिला.

रयतच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी, हा डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांचा विचार त्यांच्या अनमोल योगदानातून व कार्यातून प्रत्यक्षात उतरला. त्यांच्या शैक्षणिक सेवेचा हा वारसा माजी आमदार अशोकराव काळे यांनी समर्थपणे पुढे घेवून जात रयतच्या शाळांना आवश्यक ते सहकार्य व मदत केली. काळे परीवाराचा सदस्य या नात्याने ती परंपरा मी पण जपली असून यापुढील काळातही रयत शिक्षण संस्थेच्या शाळा-महाविद्यालयांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याची भूमिका कायम राहील, असे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, जनरल बॉडी सदस्य कारभारी आगवन, भाऊसाहेब सिनगर, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहम,दिलीपराव बोरनारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे, जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, माजी पं. स. सदस्य मधुकर टेके, गौतम बँकेचे संचालक विजयराव रक्ताटे, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक अनिल वल्टे, विक्रम सिनगर, जनरल बॉडी सदस्य नानासाहेब मते, शिवाजीराव ठाकरे, स्थानिक सल्लागार समिती सदस्य प्रकाश शिंदे, उद्धव बोरावके, अशोक काजळे, लक्ष्मण चौधरी, भोजडेचे सरपंच सुधाकर वादे, दहेगाव बोलकाचे सरपंच भरत चौधरी, कान्हेगावचे सरपंच गणेश सोनवणे, माजी उपसरपंच दत्तात्रय सिनगर, मुख्याध्यापक भास्कर काजळे, शाळा व्यवस्थापन कमिटी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, पालक, शिक्षक, विद्यार्थी व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply