कोपरगाव – कोळपेवाडी रस्त्यासाठी केंद्र सरकारचा १५ कोटींचा निधी मंजूर – आ.आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ : कोपरगाव मतदारसंघातील नागरिकांचा सुरक्षित आणि सुरळीत प्रवास होण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी रस्ते विकासासाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी मिळवून मतदारसंघातील राष्ट्रीय,राज्य, जिल्हा महामार्गांसह गाव खेड्यातील वाड्या वस्त्यांसह शेत पाणंद रस्त्यांचापण विकास केला आहे.

रस्त्यांच्या विकासासाठी केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या  विविध योजनेतून निधी कसा उपलब्ध होईल यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु असतो. त्या पाठपुराव्यातून केंद्र शासनाने कोपरगाव-कोळपेवाडी या रस्त्यासाठी १५ कोटी निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव मतदार संघातील पश्चिम भागातील गावे कोपरगाव शहराला जोडणारा व कोपरगाव शहराची बाजारपेठ फुलविण्यात महत्वाची भूमिका पार पाडणारा धारणगाव-कुंभारीचा पूल माजी आमदार अशोकराव काळे यांनी बांधल्यापासून कोपरगाव-कोळपेवाडी या रस्त्यावरची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.वाढलेल्या वाहतुकीमुळे या रस्त्याची दुरावस्था झाली असून नागरीकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्याची दखल घेवून आमदार आशुतोष काळे यांनी महायुती शासनाकडून एमडीआर-८५ वरील धारणगाव-माहेगाव देशमुख या जवळपास ५ किलोमीटर रस्त्याच्या ४.२० कोटी निधी मंजूर करून घेतला असून लवकरच या दुरुस्तीचे काम सुरु होणार आहे.

कोपरगाव- कोळपेवाडी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे आमदार आशुतोष काळे यांचा पाठपुरावा सुरु होता. काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेवून त्यांच्याकडे केलेल्या निधीच्या मागणीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. तो पाठपुरावा फळाला आला असून १५ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे व लवकरच राज्य शासनाची देखील मंजुरी मिळणार असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यानी दिली आहे.

या निधीतून या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे निश्चितच दळणवळणाच्या अडचणी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे पश्चिम भागातील नागरीकांना कोपरगावला जाण्यासाठी येणाऱ्या अडचणी कमी होणार असून कुंभारी,धारणगाव, माहेगाव देशमुख, कोळपेवाडी व सुरेगाव आदी गावातील नागरीक, विद्यार्थी, शेतकरी आणि प्रवाश्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

त्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी व महायुती शासनाचे मतदार संघातील जनतेच्या वतीने आभार मानले आहे. नागरिकांच्या अडचणीची दखल घेऊन महत्वाच्या रस्त्यासाठी पाठपुरावा करून निधी मिळविल्यामुळे  नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून नागरिकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

Leave a Reply