पाणी योजनेत राजकारण करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देणार – अर्जुनराव काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : कोपरगाव तालुक्यातील अनेक गावातील महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट कायमची थांबली जावी यासाठी आ. आशुतोष काळे यांनी जल जीवन मिशन योजना प्रभावीपणे राबवून तालुक्यातील जास्तीत जास्त गावे या योजनेत कशी बसविता येतील यासाठी आपले राजकीय वजन वापरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषद यांच्याकडून २७० कोटी रुपये निधी पाणी पुरवठा योजनांसाठी आणला आहे. या निधीतून अनेक गावातील पाणी पुरवठा योजनांचे काम सुरु झाले आहेत. तर काही योजनांचे काम सुरु होणार आहे.

महिलांसाठी पाणी प्रश्न हा अत्यंत जिव्हाळयाचा प्रश्न असून यामध्ये पडद्यामागून काही व्यक्ती राजकारण करून पाणी पुरवठा योजनांना आडवे येण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा जिव्हाळ्याच्या पाणी पुरवठा योजनांना आडवे येणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा ईशारा पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनराव काळे यांनी दिला आहे.

जल जीवन मिशन कार्यक्रम अंतगर्त कोपरगाव तालुक्यातील डाउच बुद्रुक गावचा पिण्यांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी पाठपुरावा करून ६२ लाख रूपये खर्चाची पाणी पुरवठा योजना महाविकास आघाडी सरकारकडून मंजुर करून आणली आहे. या योजनेच्या नियोजित उद्घाटनास विरोधकांनी काळे झेंडे दाखविण्याचे वृत्त प्रसिद्ध केल्याचा उपसभापती अर्जुनराव काळे यांनी समाचार घेतांना त्यांना ईशारा दिला आहे.

त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, जल जीवन मिशन कार्यक्रमाची प्रशासकीय मान्यता जिल्हा परिषद अहमदनगर यांनी दिली असून  याचा आराखडा मंजूर करण्याचा अधिकार हा राज्य शासनाला आहे. तात्कालीन महाविकास आघाडी सरकारने जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत हा आराखडा मंजूर केला आहे. या आराखड्यात कोणत्या गावाची निवड करायची हे त्या मतदार संघाचे लोकप्रतिनिधी सुचवितात. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या आराखड्याला मंजुरी देण्याचे काम राज्य शासन करते. पंचायत समितीच्या माध्यमातून आ.आशुतोष काळे यांनी ज्या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे अशा गावातील नागरिकांसमवेत वेळोवेळी बैठका घेतल्या.

या बैठकीच्या माध्यमातून त्यांना पाणी पुरवठ्याच्या अडचणी लक्षात आल्या. त्यावेळी त्यांनी जल जीवन मिशन योजना प्रभावीपणे राबवून राज्य शासनाच्या मंजूर केलेल्या आराखड्यात कोपरगाव तालुक्यातील जास्तीत जास्त गावे या योजनेत कसे बसतील यासाठी आ. आशुतोष काळे यांचे भगीरथ प्रयत्न आहेत. त्या प्रयत्नांच्या फलश्रुतीतून महाविकास आघाडी सरकारने या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे ज्यांचे कोणतेही योगदान नाही ते पडद्यामागूनजिव्हाळ्याच्या पाणी पुरवठा योजनांना आडवे येण्याचा प्रयत्न करीत आहे.

सध्या विरोधकांना विकास कामांवर बोलायला काही नाही. टीका करणे एवढेच त्यांना काम राहिले आहे. त्यामुळे त्यांनी अशा जिव्हाळ्याच्या विकासकामांना आडवे येण्याचे पाप करू नये. त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल. जलजीवन मिशन योजनेचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे काम पंचायत समिती करते. या योजनेचा आराखडा, ईस्टीमेट, कामाची मांडणी, देखरेख हि पंचायत समितीकडे असून प्रशासकीय मान्यता जिल्हा परिषदेणे दिलेली आहे. जिल्हा परिषदेचा राज्य शासनाकडे आराखडा सादर झाल्यानंतर त्याचा पाठपुरावा आ.आशुतोष काळे काळे यांनी केला. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषद यांच्याकडून कोपरगाव तालुक्याला २७० कोटी रुपये निधी पाणी पुरवठा योजनांना मिळाला आहे.

आ. आशुतोष काळे यांनी स्थानिक पातळीवर बैठका घेवून वेळोवेळी पंचायत समितीला मार्गदर्शन करून जास्तीत जास्त गावे बसविण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यामुळे या गावांच्या पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्या आहेत. राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून आ.आशुतोष काळे यांना या योजनांचे उद्घाटन करण्याचा सर्वस्वी अधिकार आहे. मात्र मागील पाच वर्षात ज्यांच्या काळात गल्लीपासून दिल्ली पर्यंत त्यांच्या पक्षाचे सरकार असतांना देखील कोपरगाव तालुक्यातील पाणी पुरवठा योजना प्रलंबित राहिल्या त्यांना याचे दु:ख आहे. त्यामुळे त्यांची पोटदुखी वाढली असून ते पडद्यामागून आडवे येण्याचा प्रयत्न करीत आहे.

गावाच्या विकासात पाणी प्रश्न हा महत्वाचा प्रश्न असून याचा महिला भगिनींना किती त्रास सहन करावा लागतो याची जाणीव ठेवा. या कामात आडवे येण्याचे पाप करू नका, काळे झेंडे दाखविण्याची भाषा विकासाला विरोध दर्शवित आहे. नागरिकांसाठी राजकारण बाजूला ठेवा. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुण्याचे काम आहे. यामध्ये आडवे येवूण पापाचे धनी होवू नका असा सल्ला काळे यांनी दिला आहे.