संदीप कोयटे यांची जम्प रोप असोसिएशन अध्यक्षपदी निवड

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ७ : क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक क्रीडा प्रकार हा लहान मुलापासून ते प्रौढांपर्यंतच्या शारीरिक सुदृढतेसाठी आवश्यक असतो. जम्प रोप या क्रीडा प्रकारामुळे प्रत्येकाचे शारीरिक स्वास्थ्य सुदृढ बनते तसेच या क्रीडा प्रकाराच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयातील खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहोत.

हेच खेळाडू राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्य, देशाचे नेतृत्व करणारे उत्कृष्ट खेळाडू बनतील आणि अहमदनगर जिल्ह्याचे नाव सातासमुद्रापार नेतील. असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा जम्प रोप असोसिएशनचे नवनियुक्त अध्यक्ष संदीप ओमप्रकाश कोयटे यांनी केले.

 समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्व.मोहनलाल आनंदराम झंवर सभागृहात अहमदनगर जिल्हा जम्प रोप असोसिएशनची सल्लागार ॲड.जयंत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली असो.चे कार्याध्यक्ष दिलीप घोडके, कोपरगाव तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष व असो.चे सहसचिव नितीन निकम, खजिनदार प्रा.संदेश भागवत, सदस्य शिवराज पाळणे, बाबासाहेब गवारे, रोहित महाले, शुभम औताडे, सार्थक बडजाते, राहुल रुईकर, आर्यन घोडके आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सहविचार सभा संपन्न झाली.

या सभेत सर्वानुमते सहकार, शैक्षणिक क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या कोयटे कुटुंबातील आणि क्रीडा क्षेत्राची विशेष आवड असणारे संदीप कोयटे यांच्याकडे अहमदनगर जिल्हा जम्प रोप असोसिएशनच्या अध्यक्षपदाची सुत्रे देण्यात आली.

    निवडीबद्दल समता परिवाराचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, अहमदनगर जिल्ह्यातील विविध क्रीडा समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार कोपरगाव तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष नितीन निकम यांनी मानले.