आठ हजाराची लाच घेतांना पकडला रंगेहात
शेवगाव प्रतिनिधी, दि. १४ : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात शेवगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयाचा कर्मचारी प्रदीप शंकर महाशिकारे (वय ४६) पद भुकरमापक वर्ग ३ हा कर्मचारी ८ हजार रुपयांची लाच घेतांना आज रंगेहात पकडण्यात आला.
तक्रारदाराच्या आजोबाच्या नावे तालुक्यातील अमरापूर शिवारातील शेत गट नं १८० मध्ये असलेल्या २१ गुंठे जमिनीची भूमी अभिलेख कार्यालाकडून मोजणी करून घेतली होती. मोजणीनुसार खातेदार यांचे पोट हिस्से करून हद्दीच्या खुणा दर्शविण्यात आल्या होत्या. त्याचा सुधारित नकाशा देण्याकरीता यातील आरोपी लोकसेवक हे १० हजार रुपयांची मागणी करत असल्याची तक्रार लाचलुचपत विभागास प्राप्त झाली होती.
त्या अनुषंगाने लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज सोमवारी ( दि१४ ) शेवगाव ताजनापूर रोडवरील स्मशान भूमीजवळ टाकण्यात आलेल्या छाप्यात आरोपी लोकसेवक याने पंचासमोर ८ हजार सुपये स्विकारले .तेव्हा आरोपीला पकडण्यात आले. या बाबत शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनीला कडासने, अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे, नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे, पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर, पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांच्यासह पोलीस हवालदार संतोष शिंदे, पोलीस नाईक रमेश चौधरी, विजय गुंगल, पोलीस अंमलदार वैभव पांढरे, रवींद्र निमसे, सचिन सुद्रूक, आसाराम बटुळे, हसन शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.