बड्या गुटखा व्यापाऱ्यांना बडे अधिकारी कधी पकडणार?

 नावाला गुटखा बंदी नक्की कोण कोणाला देतोय संधी?

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : अनेक छोट्या छोट्या गुटखा विक्रेत्यावर कारवाई करुन थातुरमातुर कारवाई केली जाते. गुटख्याच्या पाच पंचविस पिशव्या, पोती पकडून कारवाई दाखवण्यात येते पण आत्तापर्यंत कोपरगाव तालुक्यात कधीच कंटीनरवर कारवाई केली नाही. आजपर्यंत गुटखा विक्रीतील बड्या व्यापाऱ्यांना अन्न औषध प्रशासनाचे बडे अधिकारी का पकडू शकत नाहीत. किंवा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला का सापडत नाहीत. कोपरगाव तालुक्यातील एक बडा गुटखा किंग खुलेआम तीन तालुक्यात गुटखा विक्री करत असल्याचे खुलेआम चर्चा असताना कोळपेवाडीचा बडा व्यापारी कुणाच्या आशीर्वादाने इतकी मोठी गुटखा विक्री करतो. 

 गुटखा विक्रीतुन कोट्यावधीची उलाढाल खुलेआम होते. महाराष्ट्र शासनाने गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घातलेली असतानाही कोणाच्या आशीर्वादाने व सहकार्याने संपूर्ण राज्यात खुलेआम गुटखा विक्री सुरु आहे. अन्न औषध प्रशासन विभागाची भुमिका कायम संशयास्पद आहे तर पोलीसांची भुमीका विचार करायला लावणारी आहे. एखाद्या गुटखा विक्रेत्याला गुटखा विक्री करताना एकदा पकडल्यानंतर त्याला कोणी कोणी गुटखा पुरवठा केला किंवा त्याने कोणा कोणाला विकला याचा शोध लावून संपूर्ण गुटखा विक्रीची पाळे मुळे आज पर्यंत का शोधली जात नाहीत.

एकाच व्यापाऱ्यावर जर वारंवार गुटखा विक्रीचा गुन्हा दाखल होवूनही तो गुटखा विक्रीचा व्यवसाय पुन्हा पुन्हा करण्याची ताकत त्याला नक्की कोण देतं. कारवाईची भिती वाटण्या ऐवजी. कारवाई झाल्यानंतर तो विक्रेता अधिक जोमाने गुटख्याची खुलेआम विक्री करु शकतो. म्हणजेच कायद्याचा धाक नसावा किंवा पुन्हा विक्री करण्याची मुभा नकळत मिळत असावी. 

 कोपरगाव तालुक्यात आत्तापर्यंत अनेकवेळा गुटखा विक्रेत्यावर थातुरमातुर कारवाई करण्यात आली परंतु. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आजपर्यंत मोठ्या व्यापाऱ्याला पकडता का आले नाही. किंवा तो बडा व्यापारी त्यांना का सापडत नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून खुलेआम गुटखा विक्री सुरु आहे. सर्व काही आलबेल असताना अचानक नव्याने  बदलुन आलेले जिल्हा पोलिस अधीक्षक यांना आपण कर्तव्यदक्ष आहोत हे दाखवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली कि काय असा संशय येतोय.

बुधवारी पहाटे कोपरगाव शहरातील दोघा गुटखा विक्रेत्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडून कारवाई केली. दोन गाड्यासह अंदाजे तीन लाखाचा गुटखा व इतर साहीत्य पकडून तिघांना ताब्यात घेतले. ही कारवाई दोन वेगवेगळ्या ठिकाणाहुन केली. कारवाई केल्या बद्दल त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. जे अन्न औषध प्रशासन विभागाने कारवाई करायला हवी होती ते स्थानिक गुन्हे शाखेने केली. स्थानिक पोलीसांना अंधारात ठेवले पण पहाटे कारवाई झाल्यानंतरही प्रसिध्दी माध्यमापासुन कारवाईची माहीती राञी साडेसात वाजेपर्यंत दडवून ठेवली जात होती. सविस्तर व योग्य माहीती दिली जात नव्हती. माध्यमांचे प्रतिनिधी  दिवसभर फेऱ्या मारत होते पण घटनाक्रम कळु दिला जात नव्हता यावरुन चर्चेला उधान आले होते. 

 गुटखा विकणारा एक बडा व्यापारी शेजारच्या तीन तालुक्याला गुटखा पुरवठा करतोय आणि त्याची वरिष्ठ पातळीवर पोहच असल्याची तालुक्यात चर्चा आहे. मग एखाद्या व्यापाऱ्याची वर्षानुवर्षे खुलेआम चर्चा होत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याला किंवा इतर बड्या अधिकाऱ्यांना हे का दिसत नाही. नवे पोलीस अधीक्षक या गंभिर बाबीत लक्ष घालतील का? गुटखा विक्री करणारे बडे व्यापारी व गुटखा विक्रीला छुपा पाठिंबा देणाऱ्या अधिकाऱ्यांना लगाम घालणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.