कोपरगांव प्रतिनिधी, दि. २५ : जागतिकीकरणाच्या युगात उद्योग क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रानेही आता लक्षवेधी भरारी घेतली आहे. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच क्रीडा क्षेत्रात भविष्य घडविण्याची चांगली संधी उपलब्ध झालेली असून या संधीचा विद्यार्थ्यांनी आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी श्रीमती भाग्यश्री बिले यांनी संवत्सर येथे आयोजित कार्यक्रम केले.
खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संवत्सर येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात श्रीमती भाग्यश्री बिले बोलत होत्या.
प. पू. महंत रमेशगिरीजी महाराज, जि. प. चे माजी सदस्य राजेश परजणे पाटील, तहसीलदार विजय बोरुडे, पंचायत समितीचे कृषी व बालविकास अधिकारी पंडितराव वाघिरे, सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब साबळे, गट शिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख, उप अभियंता श्री लाटे, शाखा अभियंता जी. पी. गुंजाळ, विस्तार अधिकारी बबनराव वाघमोडे, श्री तोरवणे, डिजीटल तज्ज्ञ संदीप गुंड, ग्रामविकास अधिकारी कृष्णदास आहिरे यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मुख्याद्यापक फय्याजखान पठाण यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
खेळ ही मानवास लाभलेली निसर्गदत्त देणगी आहे. प्रत्येक माणूस हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे क्रीडा क्षेत्राशी जुळलेला असतो. या क्षेत्राशी प्रामाणिक राहून वाटचाल केली तर भविष्यात स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे सामर्थ्य निर्माण होते असे सांगून श्रीमती बिले पुढे म्हणाल्या, अलिकडच्या काळात खेळाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. विविध खेळांच्या प्रिमियर लीग सुरु झालेल्या असून त्यासाठी अनेक उद्योजक पुढे येऊन प्रायोजक म्हणून प्रचंड पैसा त्यात टाकत आहेत.
क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्यांना या माध्यमातून मोठ्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. त्यातच महिला खेळाडुंना आज पुरुषांच्या बरोबरीने स्थान दिले जात असल्याने शासनाच्या व सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून महिला खेळाडुंचा सहभाग वाढताना दिसून येत आहे. ग्रामीण भागातील महिला खेळाडुंचा क्रीडा क्षेत्रातला सहभाग आज म्हणावा तितका वाढलेला दिसत नाही. तो वाढविण्याच्यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे असल्याचेही श्रीमती बिले यांनी सांगितले. इंग्रजी शाळांच्या तुलनेत संवत्सरची शाळा कोणत्याच क्षेत्रात कमी नाही ही कौतुकास्पद गोष्ट असल्याचेही त्या म्हणाल्या.
प. पू. महंत रमेशगिरीजी महाराज म्हणाले, स्व. नामदेवरावजी परजणे आण्णा यांच्या संकल्पनेतील शिक्षण व्यवस्था संवत्सरसारख्या गांवात आज नांवारुपास आली असून त्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे यांना नक्कीच श्रेय द्यावे लागेल. डिजिटल शिक्षण या शाळेत उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी त्याचा चांगला लाभ झालेला आहे. राज्यातील इतर शाळांनी आदर्श घ्यावा अशा प्रकारची प्रगती संवत्सरच्या जिल्हा परिषद शाळेने केलेली असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
या कार्यक्रमापूर्वी संवत्सर गांवातील महंत राजधरबाया प्राणवायू स्मृतीवनात तसेच जिल्हा परिषद शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. याशिवाय शाळेच्या प्रांगणातील ओपन जिमचे उद्घाटन, शाळेसाठी सुमारे साडेसहा लाखाहून अधिक रकमेच्या क्रीडा साहित्याचे वितरण, डिजीटल क्लासरुममधील इंटर अॅक्टीव्ह बोर्डाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेचे माजी विद्यार्थी सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब सावळे यांनी डिजीटल क्लासरुमसाठी ६५ हजार रुपये देणगी दिली. तर जि. प. चे माजी सदस्य राजेश परजणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोदावरी दूध संघाच्या कार्यस्थळावरील गाळेधारकांनी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी जमविलेली आर्थिक मदत यावेळी शाळेकडे सुपूर्द केली.
कार्यक्रमासाठी लक्ष्मणराव साबळे, खंडू फेपाळे, सोमनाथ निरगुडे, लक्ष्मणराव परजणे, बाळासाहेब दहे, राजेंद्र ढेपले, संभाजीराव भोसले, विजयराव जगताप, मोहन राठोड, आबा नानकर, बाळासाहेब वरगुडे यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन मुख्याद्यापक फय्याजखान पठाण यांनी केले तर गट शिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी आभार व्यक्त केले.