शेवगाव प्रतिनिधी, दि. २९ : तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी आज मंगळवारी सरपंचपदासाठी सहा गावातून आठ तर सदस्य पदासाठी ३१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
निवडणूका होणाऱ्या गावापैकी – खानापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी सर्वाधिक ३ उमेदवारी अर्ज दाखल झाले तर आखेगाव, रांजणी ,वाघोली, अमरापूर, रावतळेकुरुडगाव येथे प्रत्येकी एकेक उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. ग्रामपंचायत सदस्य पदासाठी वाघोली येथे सर्वाधिक १० उमेदवारी अर्ज दाखल झाले तर खानापूर ८, आखेगाव ६, खामगाव ५ व रांजणी, रावतळेकुरुडगाव येथे प्रत्येकी एकेक अर्ज दाखल झाले आहेत.
येत्या शुक्रवार (दि.२ डिसेंबर ) अखेर उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असल्याने पुढील तीन दिवस मोठया संख्येने अर्ज दाखल होण्याचे संकेत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्राची जमवाजमव करण्यासाठी, तर उमेदवारांचे अनुकुल पॅनल तयार करण्यात नेत्यासह कार्यकर्त्यांची धामधुम जोरात सुरु असल्याने ऐन थंडीच्या कडाक्यात निवडणुका होणाऱ्या गावांचे राजकारण ढवळून निघाले आहे.
यावेळी सरपंच पद थेट जनते मधून निवडले जाणार असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीतील चुरस वाढली आहे. आज सरपंचपदासाठी अर्ज दाखल करणारे उमेदवार व ग्रामपंचायती –
वाघोली- सुस्मिता उमेश भालसिंग, अमरापूर- आशाताई बाबासाहेब गरड, खानापूर – शितल मंगेश थोरात, दूर्गा नवनाथ थोरात, संगिता ज्ञानदेव थोरात. रांजणी – भगवान चव्हाण, आखेगाव- आयोध्या शंकर काटे, रावतळे कुरुडगाव – चंद्रकला कल्याण कवडे.