शेवगाव प्रतिनिधी, दि. १ : माजी आमदार स्व.राजीव राजळे यांच्या जयंती निमित्ताने शेवगाव शहर व तालुक्यातील राजीव राजळे मित्र मंडळाच्या वतीने राजीव बुक फेस्ट २०२२ भव्य पुस्तक प्रदर्शनाचे येत्या ५ डिसेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत शेवगाव येथील आखेगाव रस्त्यावरील स्वराज्य मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आल्याची माहिती संयोजक माजी नगरसेवक महेश फलके यांनी दिली.
आजच्या युवा पिढीत वाचन संस्कृती वाढीस लागावी तसेच लोकातील वाचन संस्कृती टिकून रहावी यासाठी माजी नगरसेवक फलके यांच्या संकल्पनेतून गेल्या काही वर्षापासून माजी आमदार स्व.राजीव राजळे यांच्या जयंती निमित्त शेवगाव शहरात पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या ५ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. मुख्यमंत्री सहाय्यता पक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, उद्योजक व जेष्ठ लेखक शरद तांदळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून बुधवारी दि.७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वा. जेष्ठ लेखक व सिनेअभिनेते दीपक करंजीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आ.मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात या उपक्रमाचा समारोप होणार आहे.
यावेळी शहरातील पद्मभूषण बाळासाहेब भारदे विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक एसव्ही कुलकर्णी यांचा जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मान होणार आहे. या उपक्रमात शहर व तालुक्यातील पुस्तक प्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संयोजक, राजीव राजळे मित्र मंडळाने केले आहे.