हवामानानुसार शेती व्यवस्थापन हाच कृषी क्रांतीचा मूलमंत्र – पंजाबराव डख

शेवगाव प्रतिनिधी, दि. २२ : आधुनिकीकरणामुळे सध्या हवामानामध्ये गतीने बदल होत आहेत. हवामानाचा योग्य अंदाज लक्षात घेऊन शेती व्यवस्थापन करणे हे आज शेतकऱ्यांपुढील मोठे आव्हान आहे. उत्पादनासाठी होणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ न बसल्यामुळे शेती करण्याबाबत शेतकरी वर्गामध्ये अनास्था दिसून येते.

जे शेतकरी हवामानाचा अचूक अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ते बदल करतात व बदल जाणून घेण्यास आग्रही असतात त्याच शेतकऱ्यांची शेती फायद्याची होते. थोडक्यात हवामानानुसार शेती व्यवस्थापन हाच कृषी क्रांतीचा मुल मंत्र असल्याचे प्रतिपादन प्रसिध्द हवामानतज्ञ पंजाबराव डख  यांनी येथे केले.

       तालुक्यातील वरुर येथे अभिनव फाउंडेशनच्या वतीने ‘हवामान आधारित शेती’ या विषयासह आयोजित विविध कार्यक्रमांच्या शिबीरात  ते बोलत होते. यावेळी डख यांनी पुढील वर्षी पाऊस समाधानकारक होणार असल्याचे भाकित करुन शेतीमध्ये पेरणी करतांना कमी क्षेत्रात जास्तीत जास्त  उप्तादन घेण्याचे तंत्र शेतकऱ्यांनी अवगत करावे असे आवाहन देखील केले.

       सामाजिक कार्यकर्ते सचिन म्हस्के यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून अभिनव फौंडेशनने नेत्ररोग तपासणी अभियान व रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यात  ८५  युवकांनी रक्तदान केले तर शंभर लाभार्थींनी मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला. बुधराणी हॉस्पिटल व रोटरी क्लब शेवगावचे या कामी विशेष सहकार्य लाभले. 

     यावेळी गटविकास अधिकारी महेश डोके, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके, माजी सरपंच विष्णु पा.म्हस्के व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता प्राप्त पंचक्रोशीतील २०  विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. दरम्यान आबासाहेब बेडके, माणिकराव म्हस्के यांची भाषणे झाली.  सचिन म्हस्के यांनी प्रास्ताविक केले. कल्याण देवढे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभिनव फौंडेशनचे अध्यक्ष वैभव पुरनाळे व गावातील युवकांनी विशेष परिश्रम घेतले.