कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : समाजात मुलींच्या बाबतीत घडत असलेल्या विविध घटनांमुळे मुलींच्या पालकांना मुलींची सुरक्षितता हा चिंतेचा विषय निर्माण झाला आहे. या चिंतेतून मुक्त होण्यासाठी मुलींवर चांगले संस्कार करून त्यांना आपल्या संभाषण व मैत्रीपूर्ण वागण्यातून आत्मविश्वास देवून निर्भय बनवावे असे प्रतिपादन गौतम बँकेच्या माजी संचालिका व स्थानिक स्कूल कमिटीच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे यांनी केले.
सालाबाद प्रमाणे याहीवर्षी स्व.सौ.सुशीलामाई काळे यांच्या स्मरणार्थ राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर व कला,विज्ञान कनिष्ट महाविद्यालय गौतमनगर-सुरेगाव येथे राज्यस्तरीय भव्य वक्तृत्व स्पर्धेचे उदघाटन सौ.पुष्पाताई काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले याप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, संस्कार अतिशय महत्वाचे असून त्याचा सामाजिक स्तरावर फायदा होतो.
आपल्या संस्कारातून स्वभावाचे दर्शन होते. हे संस्कार निश्चितपणे समाजात सुरक्षित रहाण्यासाठी उपयोगी पडतात. आपल्या वागण्यातून समोरच्या व्यक्तीच्या मनात धाक निर्माण झाला पाहिजे अशी प्रतिमा मुलींनी तयार केली पाहिजे असा बहुमोल सल्ला सौ.पुष्पाताई काळे यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थिनींना दिला.
याप्रसंगी बोलतांना अरुण चंद्रे म्हणाले की, वक्तृत्वातून व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब दिसून येत असून समाजात व्यक्त होण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा उत्तम व्यासपीठ आहे. सौ.सुशीलामाई काळे या काळे परिवारा पुरत्याच मर्यादित नव्हत्या. त्यांचे सामाजिक व शैक्षणिक योगदान मोठे आहे. स्व.कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांना शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात मोलाची साथ देऊन समाजाचं दायित्व स्वीकारून त्यांनी दुहेरी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. त्यांचे विचार आत्मसात करून अंगीकारणे हीच त्यांना खरी सुमनांजली असल्याचे त्यांनी सांगितले.
ही स्पर्धा ७ वी ते ८ वी (लहान गट) एकुण ५५ स्पर्धक, ९ वी ते १० वी (मध्यम गट) एकुण ६२ स्पर्धक आणि ११ वी ते १२ (मोठा गट) २३ स्पर्धक अशा तीन गटात घेतली गेली जाणार आहे. या स्पर्धेतील लहान गटासाठी झाडे लावा झाडे जगवा, जगाचा पोशिंदा शेतकरी, त्यागमूर्ती रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचे योगदान, मध्यम गटासाठी महिला सक्षमीकरण, स्वच्छ भारत-सुंदर भारत, कै. सौ. सुशीलामाई उर्फ माईसाहेब काळे यांचे सामाजिक व शैक्षणिक योगदान, मोठा गट व्यसन –सोशल मिडियाचे, पालटले चित्र समाजाचे, युवा शक्ती-राष्ट्र शक्ती, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे सामाजिक व शैक्षणिक योगदान हे विषय स्पर्धेसाठी देण्यात आले आहेत.
विजयी स्पर्धकांना रोख स्वरूपात बक्षीस, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक देण्यात येणार असून त्या बरोबर सांघिक पारितोषिके फिरता करंडक व प्रशस्तीपत्रक आणि सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत अहमदनगर नासिक, औरंगाबाद या जिल्ह्यातील स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आर.जे. सायकल्स बारामती यांच्या वतीने विद्यार्थिनींना अत्यल्प दरात देण्यात आलेल्या सायकल्सचे सौ. पुष्पाताई काळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
या प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे, माजी संचालक अरुणराव चंद्रे, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य कचरू कोळपे, सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे, सदस्य डॉ.आय.के.सय्यद, भाऊसाहेब लुटे, आबा आभाळे, बाळासाहेब ढोमसे, जनार्दन कोळपे, छत्रपती शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश चौरे, छत्रपती संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे आदी मान्यवर उपस्थितीत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत प्राचार्या सौ छाया काकडे यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती रोहिणी म्हस्के यांनी केले तर आभार वक्तृत्व स्पर्धा समितीचे सचिव रविंद्र मेढे यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.