सरपंचाच्या विशेष अधिकाराला आले महत्व
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : तालुक्यातील २६ ग्रामपंचायत पैकी १२ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांची निवडणूक आज पार पडली असून यामध्ये आमदार आशुतोष काळे गटाचे सर्वाधिक सात उमेदवार उपसरपंचपदी बिनविरोध निवडून आले. माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवानेते विवेक कोल्हे यांच्या गटाचे तीन, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे व अपक्ष यांचे प्रत्येकी एक उपसरपंच निवडून आले.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकी संपन्न झाल्या. येत्या तीन दिवसामध्ये विविध ग्रामपंचायत उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. आज १२ ग्रामपंचायतचे नूतन सरपंचाच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणुक झाली. बहुतांश ठिकाणी उपसरपंच बिनविरोध निवडून आले आहे.
नवनिर्वाचित सरपंचांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली. आमदार आशुतोष काळे गटाचे बिनविरोध निवडून आलेले उपसरपंच ग्रामपंचायत निहाय पुढीलप्रमाणे माहेगाव देशमुख- भास्करराव किसनराव काळे, कोळपेवाडी-आण्णा रखमा कोळपे, भोजडे-वाल्मिक शंकर सिनगर, सडे-अनिल गणपत बारहाते, वडगाव-प्रवीण सुखदेव कांगणे, मोर्विस-पंडित पोपट पगारे, शहापूर-सागर किसन घारे.
माजी आमदार स्नेहलता कोल्हे गट खिर्डी गणेश- निलेश वराडे, शिंगणापूर -रत्ना संवत्सरकर , रांजणगाव देशमुख -त्रंबक रामभाऊ वर्पे (काळे-कोल्हे युती) , वेस- सोयगाव येथे आनंदा भडांगे -अपक्ष तर पढेगाव ग्रामपंचायतमध्ये लक्ष्मण विश्वनाथ शिंदे (कोल्हे -परजणे युती) उपसरपंच म्हणून निवडून आले.
शहापूर मध्ये सरपंचानी केला विशेष मतदानाचा वापर –
शहापूर ग्रामपंचायतमध्ये काळे गटाचे सरपंच असून काळे गटाचे तीन तर कोल्हे गटाचे चार सदस्य निवडून आले. सरपंचानी काळे गटाच्या उमेदवाराला मतदान केल्याने दोन्ही गटाचे समसमान मते झाली. त्यामुळे नव्या अध्यादेशानुसार सरपंचानी आपल्या विशेष अतिरिक्त मतदानाचा वापर केला. ते मत काळे गटाच्या उमेदवाराला दिल्याने येथे काळे गटाचे सागर घारे हे विजयी झाले. तर कोल्हे गटाच्या निर्मला घारे यांचा एका मताने पराभाव झाला.