बदनामी विरोधात पालीका कर्मचाऱ्यांचे काम बंद अंदोलन
कोपरगाव प्रतिनिधी दि.५ : कोपरगाव नगरपालीकेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी हे एका चहाच्या हाॅटेलमध्ये बसुन ठेकेदाराकडून पैसे गोळा करत बसतात असा आरोप मनसेचे संतोष गंगवाल यांनी युवा नेते विवेक कोल्हे यांच्या आढावा बैठकीत सर्वांसमक्ष केल्याने एकच खळबळ उडाली त्यावरुन गुरुवारी पालीकेच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी सकाळी काम बंद आंदोलन करून पालीके समोर ठिय्या मांडला होता. मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी कामगारांना समजावून सांगत अखेर काम बंद आंदोलन स्थगित केले.
यावेळी बोलताना मुख्याधिकारी शांताराम गोसावी म्हणाले, संतोष गंगवाल यांनी बांधकाम विभागाचे अधिकारी सुनिल ताजवे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. जर त्यांना त्या अधिकाऱ्या बद्दलचे सबळ पुरावे असतील तर त्यांच्या विरोधात रितसर लेखी तक्रार करावी अन्यथा थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी माञ आकस बुध्दीने विनाकारण आरोप करुन अधिकाऱ्यांचे खच्चीकरण करु नये.
बिनबुडाचे आरोप करुन इतर अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खचु देवू नका. आम्हाला चांगल्या कामाबद्दल भले शाबासकी देवू नका पण विनाकारण बदनामी करणे योग्य नाही. सध्या पालीकेकडे अभियंता कमी आहेत. बांधकाम विभागाला अधिकारी नाही तरीही विकास कामांना गती देत आहोत केवळ राजकीय आकसापोटी अधिकाऱ्यांची बदनामी कोणीही करु नये. अशी खंत व्यक्त गोसावी यांनी व्यक्त केली.
यावेळी बांधकाम विभागाचे अभियंता सुनील ताजवे म्हणाले, मला राहता व कोपरगाव या दोन पालीकेचे कामकाज पहावे लागते त्यामुळे माझी तारेवरची कसरत होते. विकास कामाला मी प्राधान्य देवुन दर्जेदार कामे करुन घेत असताना माझ्यावर भ्रष्टाचाराचे जे आरोप केले आहेत ते पुर्ण खोटे असुन संतोष गंगवाल यांनी तसे पुरावे सादर करावे अन्यथा गंगवाल यांच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार आहे. मी कधीच कुठल्या चहाच्या हाॅटेलमध्ये बसुन ठेकेदाराकडून पैसे घेतले नाहीत. ज्या कोणी ठेकेदाराने पैसे दिले असतील त्यांनी पुरावे द्यावे विनाकारण बिनबुडाचे आरोप करुन माझ्यासह इतरांचे खच्चीकरण करू नये असेही ते म्हणाले. यावेळी अभियंता ऋतुजा पाटील, वसुली अधिकारी श्वेता शिंदे, यांनीही झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला.
दरम्यान मंगळवारी भाजपचे कार्यकर्ते नागरीक व इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यासमवेत युवा नेते विवेक कोल्हे यांनी पालीकेच्या दालनात शहराच्या समस्या संदर्भात आढावा बैठक घेतली यावेळी कोल्हे यांच्यासह संतोष गंगवाल व इतरांनी पालीकेच्या कामकाजावरून मुख्याधिकारी शांताराम गोसावी व इतर अधिकाऱ्यांना धारेवर धरत कामातील दर्जा होणारी कुचराई, भ्रष्टाचार यावर बोट ठेवत धारेवर धरले होते.
शहराच्या पाणी प्रश्नावर विवेक कोल्हे यांनी पालीका प्रशासनाची बोलती बंद केली होती. अशातच मनसेचे संतोष गंगवाल यांनी थेट भ्रष्टाचार केल्याचा आरोप केल्याने पालीकेच्या अधिकाऱ्या बरोबर, पालीकेच्या ठेकेदाराकडून भाजपच्या कार्यकर्त्ये व मनसेच्या गंगवाल यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करीत झालेल्या आरोपाचा निषेध करुन काम बंद अंदोलन केल्याने शहरात चर्चेचा विषय झाला आहे. या आंदोलनात अखिल भारतीय सफाई कामगार संघटना, नगरपरिषद कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य संवर्ग कर्मचारी संघटना आदी संघटनेचे कर्मचारी काम बंद आंदोलनात सहभागी झाले होते.