कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : ज्ञानदीप संस्कारम् फाऊंडेशन धोंडेवाडी यांच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी, विद्यार्थ्यांचा वर्तमान आणि भविष्यकाळ दोन्हीही उज्वल करण्यासाठी तसेच शिक्षणाविषयी जनजागृती करण्यासाठी ग्रामीण भागात प्रथमच प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा.नितीन बानगुडे पाटील यांचे शैक्षणिक व्याख्यान दिनांक १६ जानेवारी २०२३ रोजी शेतकरी माध्यमिक विद्यालय धोंडेवाडी – जवळके येथे आयोजित केलेले आहे.
याप्रसंगी फाऊंडेशन तर्फे उभारण्यात आलेल्या संगणक कक्ष, ग्रंथालय व वाचनालय यांचा उद्घाटन समारंभ तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा व विविध खेळांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडणार आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यातील संधी,विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी,विद्यार्थी – पालक -शिक्षक यांच्यातील सामंजस्य तसेच कोरोना काळात विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी च्या उपाययोजना – अशा विविध विषयांवर प्रकाश टाकला जाईल, अशी माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल दरेकर यांनी माहितीपत्रकाद्वारे दिली.
गेल्या तीन वर्षात फाऊंडेशन तर्फे विविध उपक्रम राबविले असून त्यामध्ये संस्कारम् शैक्षणिक दत्तक योजना, फूटपाथ रात्र शाळा, माझं गाव माझी शाळा, रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी शिबिर, वृक्षारोपण, उच्चशिक्षणासाठी विद्यार्थ्याना प्रोत्साहन आणि मदत, विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन शिबिर असे विविध उपक्रम राबविण्यात आलेले आहेत. अशी माहिती फाऊंडेशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब गव्हाणे यांनी दिली. या व्याख्यानाचा परिसरातील नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन ज्ञानदीप संस्कारम् फाउंडेशन तर्फे सचिव किरण नेहे यांनी केले आहे.