पोलीस निरीक्षक पुजारी यांची अवैध वाळू वाहतुकीविरुध्द कारवाई

९ लाख ३० हजाराचा मुददेमाल केला जप्त

शेवगाव प्रतिनिधी, दि. १५ : शेवगावचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी हे आपल्या फौज फाट्यासह पहाटेच्या वेळी  शासकीय वाहनातून पेट्रोलिंग करीत असताना तालुक्यातील बोधेगाव – पाथर्डी रस्त्यावरील आधोडी फाटया जवळ  अवैध वाळू वाहतूक करणारा नऊ लाख रुपयाचा डंपर व तीस हजार रुपयाची तीन ब्रास वाळू असा एकूण नऊ लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांनी जप्त  केला असून  चालकाला ताब्यात घेऊन त्याचे विरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे ही घटना आज पहाटे  घडली आहे.

        या संदर्भात अधिक माहिती अशी की पोलीस निरीक्षक पुजारी यांना गुप्त बातमीदाराकडून  होणाऱ्या या वाहतूकी बाबत बातमी मिळाली असता आधोडी फाटया जवळ त्यांनी सापळा लावला. पहाटे ६ चे सुमारास बातमी प्रमाणे एक टाटा कंपनीचा पांढऱ्या रंगाचा डंपर क्र. एम एच 12 एचडी 8569 पकडण्यात आला. त्या वरील चालक  दीपक योसेफ गरुड ( वय-२०  रा.इंदिरानगर, तिसगाव ता.पाथर्डी )  यास वाळू वाहतुकीच्या परवाना बाबत विचारणा केली असता  त्याच्याकडे कोणताही परवाना नव्हता. 

शासनाची कोणती परवानगी न घेता बेकायदेशीर वाळू चोरी करून पर्यावरणाचा ऱ्हास करून तो वाळूची वाहतूक करताना मिळून आला म्हणुन ९ लाख-रु.किमतीचा.एक टाटा कंपनीचा  डंपर व ३०हजार-रु किंमतीची ३ ब्रास वाळु डंपरमध्ये मिळुन आल्याने सदरचे वाहन जप्त़ करुन शेवगाव पोलीस स्टेशनला आणुन त्याचे विरुध्द़ पोकॉ.  बप्पासाहेब धाकतोडे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

डंपर चालक दिपक गरुड यांचे विरुध्द़ कलम ३७९ सह पर्यावरण संरक्षण अधि. कलम -३ , १५ प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली असुन पुढील तपास पोना. शहाजी आंधळे करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्प़र पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोना. शहाजी आंधळे, पोकॉ. बप्पासाहेब धाकतोडे, पोकॉ.राहुल खेडकर यांनी केली आहे.