कोपरगाव प्रतिनिधी, दि, २४ : तालुक्यातील भोजडे चौकी परिसरातील किरण ठाकरे यांच्या घरावर अवकाशातून दगडासारखी टणक वस्तू पहाटेच्या सुमारास घराचा पत्रा छेदून घरात पडल्याने ठाकरे कुटुंबियांसह परिसरात एकच धावपळ सुरू झाली.
पडलेली वस्तू ओबडधोबड आकाराची असल्याची माहिती घराचे मालक किरण ठाकरे यांनी दिली. पहाटेच्या दरम्यान अचानक घरावर दगडफेक झाल्याचा भास ठाकरे कुटुंबला झाला होता. मात्र शेजारी राहणाऱ्या महेंद्र सिनगर यांनी आकाशातून चमकत जमिनीच्या दिशेने झेपावणारी वस्तू प्रत्यक्ष पाहिल्याने हे कोणी फेकलेले नसून हे आकाशातून पडले असल्याचे सांगितले.
या घटनेची माहिती ठाकरे यांनी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना दिली. जाधव यांनी तातडीने घटनास्थळी पोलिसांना पाठवून घटनेचा पंचनामा करून आकाशातून पडलेल्या त्या वस्तूला तहसीलदार विजय बोरुडे यांच्या मार्फत पुढील तपासणीसाठी खगोलशास्त्रज्ञाकडे पाठवले आहे.
सदर घटनेची समाज माध्यमांवर मोठी चर्चा झडली होती. काहीं नागरिक उल्का सदृश्य वस्तू पडल्याचे तर काहीं आगीचा गोळा पडल्याची तर काहींनी टणक वस्तू असल्याची चर्चा करत होते. दरम्यान सदर टणक वस्तू घराचा पत्रा छेदून घरात पडली घरात सुद्धा एक ते तीन इंचाचा खड्डा पडला असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
सुदैवाने या घटनेत कुणालाही काहीही इजा झालेली नाही. दरम्यान सायंकाळ पर्यंत सदर वस्तू नेमकी काय होती याबाबत खुलासा करण्यात आला नाही. एकंदरीत या घटनेमुळे चर्चेला उधाण आले होते.