कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व प्राथमिक आरोग्य केंद्र, चासनळी यांच्या सहकार्याने कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या मोफत सर्व रोग निदान आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून ऊस तोडणी कामगारांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे यांनी दिली आहे.
ऊस तोडणी मजुरांची व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आले होते. त्या निर्देशानुसार शनिवार (दि.११) रोजी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर वास्तव्यास असलेल्या ऊस तोडणी कामगारांच्या वसाहतीमध्ये मोफत सर्व रोग निदान आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन कारखान्याचे व्हा.चेअरमन दिलीपराव बोरनारे याच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बोलतांना कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे म्हणाले की, ऊस तोडणी कामगार साखर कारखान्याच्या गळीत हंगामाबरोबरच उद्योग समुहाचा देखील एक महत्वाचा घटक आहे. ऊसतोड कामगारांना ऊस तोडीच्या अतिशय कष्टाच्या कामामुळे स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे भविष्यात मोठ्या आजारांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे व कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराच्या माध्यमातून ऊसतोडणी कामगारांची आरोग्य तपासणी करून तपासणीअंती निदान झालेल्या आजारांवर मोफत औषधोपचार देण्यात येणार आहे. ऊस तोडणी कामगारांनी व त्यांच्या कुटुंबांनी डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घेवून आपले व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन केले. या आरोग्य शिबिरात ऊस तोडणी कामगारांचे रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण, गरोदर महिलांची व लहान मुलांची तपासणी करण्यात आली.
या मोफत आरोग्य तपासणी शिबीर प्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन दिलीपराव बोरनारे, कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद, मुख्य शेतकी अधिकारी कैलास कापसे, डॉ. एस.आर.जैन, फायनान्स मॅनेजर सोमनाथ बोरनारे, नितीन गुरसळ, मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सहा.वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत देसाई, डॉ. पूजा वाबळे, आरोग्य सहाय्यक आर. एच. शेख, आरोग्य सेविका श्रीमती व्ही. एल. तरोळे, आरोग्य सेवक गणेश पवार, श्रीमती शितल म्हस्के, श्रीमती सीमा धेनक, सौ. वैशाली शेरमाळे, सौ. मीरा कापसे, श्रीमती मुक्ता गोधडे, सौ. उज्वला निकम, सौ. आम्रपाली मेहेरखांब, सौ. सविता लोंढे तसेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आरोग्य शिबीर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.