कोपरगाव शहरात एकाच रात्री तीन चारचाकी गाड्या चोरीला

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : एकाच रात्री शहरातील विविध भागातून लाखो रुपयांच्या तब्बल तीन चारचाकी गाड्या चोरून गुन्हेगारांनी पोलीसापुढे आव्हान उभे केले आहे. शहरातून एवढ्या मोठ्या प्रमाणवर गाड्या चोरीला जाण्याची हि पहिलीच घटना असून गेल्या काही महिन्यापासून चारचाकी गाड्या चोरीला जाण्याचे प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. शहर पोलिसांनी आरोपींचा तात्काळ शोध घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

शहरातील साईनगर भागात राहणारे व्यवसायाने वकील असणारे मनोज बाळासाहेब कडू यांच्या घरासमोर कुलूप लावलेली पाच लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी कंपनीची इरटीका गाडी क्र. एम. एच. १७ बी. व्ही. ०४३६ हिचे काच फोडून कुलूप तोडून अज्ञात आरोपींनी चोरून नेली.

सह्याद्री कॉलनी येथील रहिवासी चार्टर्ड अकौंटंट असलेले दत्तात्रेय बाळाजी खेमनर यांची दीड लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर गाडी क्र. एम एच १७ ए जे ७७२५ हि कोणी तरी अज्ञात चोरट्याने काच फोडून सेंटर कुलूप तोडून चोरून नेली. दरम्यान सुभद्रानगर भागातील रहिवासी असलेले जगदीश लक्ष्मीनारायण झंवर यांची सात लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी कंपनीची इरटीका गाडी क्र एम एच १७ बीव्ही ८४४० हि गाडी अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

सदरच्या तीन हि घटना मध्यरात्री घडल्या आहेत. शहरातून दुचाकी, सायकली चोरीला जाण्याचे प्रकार सर्रास घडत असतात. मात्र चोरट्यांचा तपास लागत नाही. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नसल्याने अशा प्रकारच्या चोऱ्यामध्ये वाढ झाली आहे. पोलीस जिल्हा अधीक्षक यांनी या प्रकरणी गांभीर्यपूर्वक लक्ष घालून अज्ञात आरोपींचा शोध लावावा व नागरिकांना भयमुक्त करावे अशी मागणी होत आहे.