छत्रपती संभाजीनगर व धाराशिव नामांतराचा निर्णय ऐतिहासिक – माजी आमदार कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : औरंगाबादचे नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ व उस्मानाबादचे नामांतर ‘धाराशिव’ असे करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली असून, नामांतराचा हा निर्णय स्वागतार्ह आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या प्रदेश सचिव व माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. औरंगाबाद व उस्मानाबादच्या नामांतराच्या निर्णयास मंजुरी दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्रातील गतिशील सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लावला आहे, अशा शब्दांत कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.

औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे नामांतर ’धाराशिव’ करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. ही मागणी आता मान्य झाली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील नव्या सरकारने १६ जुलै २०२२ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे नामकरण ‘छत्रपती संभाजीनगर’ व उस्मानाबादचे नामकरण ‘धाराशिव’ असे करण्याचा नवीन प्रस्ताव मंजूर करून तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता.

अखेर केंद्र सरकारने शुक्रवारी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता यापुढे औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ तर उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’ असे असणार आहे. जनतेचे बऱ्याच दिवसांपासूनचे हे नामांतराचे स्वप्न अखेर पूर्णत्वास गेले आहे, याबद्दल स्नेहलताताई कोल्हे यांनी आनंद व्यक्त केला आहे.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनीही औरंगाबादचे नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ व उस्मानाबादचे नामांतर ‘धाराशिव’ असे करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयास केंद्र सरकारने मंजुरी दिल्याबद्ल पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे अभिनंदन केले आहे.

मुघल साम्राज्याचा बादशाह औरंगजेब याने छत्रपती संभाजी महाराज यांचा अनन्वित छळ करून त्यांची हत्या केली. त्यामुळे औरंगजेबाच्या नावाचे शहर नको, औरंगजेबाचे नाव काढून छत्रपती संभाजी महाराजांचे नाव औरंगाबाद शहराला द्यावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. तसेच उस्मानाबादचे नामांतर करण्याचीही खूप जुनी मागणी होती. शिंदे-फडणवीस सरकारने जनभावना लक्षात घेऊन औरंगाबादचे नामकरण ‘छत्रपती संभाजीनगर’ व उस्मानाबादचे नामकरण ‘धाराशिव’ असे करण्याचा नवीन प्रस्ताव मंजूर करून तो मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला होता.

केंद्र सरकारने हा प्रस्ताव मान्य करून या दोन्ही शहरांच्या नामांतराच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. महापुरुषांचा अभिमान जागृत ठेवण्याच्या दृष्टीने शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे विवेक कोल्हे यांनी म्हटले आहे. औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ व उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण करण्याचा मोठा निर्णय घेऊन जनतेची अनेक दिवसांपासूनची मागणी मार्गी लावल्याबद्दल विवेकभैय्या कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी रयतेची जीवापाड काळजी घेत अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले. छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अल्प काळात मराठा साम्राज्याच्या विस्तार आणि बचाव केला. मुघल बादशाह औरंगजेबाशी संभाजी महाराजांनी एकहाती लढा दिला. संभाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळात एकूण १२० लढाया केल्या व १२० पैकी एकाही लढाईत त्यांना अपयश आले नाही. असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव राजे होते.

संभाजी महाराजांचे कर्तृत्व अतुलनीय होते. त्यामुळे अशा पराक्रमी संभाजी महाराजांचे नाव औरंगाबाद शहराला देण्याचा निर्णय घेऊन राज्य व केंद्र सरकारने त्यांचा यथोचित गौरव केला असून, महाराष्ट्राची अस्मिता जागृत ठेवली आहे, असेही कोल्हे यांनी नमूद केले आहे.