कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : शहरातील धारणगाव रोडवरील छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते लक्ष्मीनगरपर्यंत भूमिगत गटारीचे काम नगरपालिका प्रशासनाने हाती घेतले असून, भाजपच्या माजी नगरसेविका वैशाली विजय आढाव यांनी केलेल्या मागणीवरून या भूमिगत गटारीचा आकार वाढविण्यात आला आहे. या भूमिगत गटारीची साईज ३६ इंच प्रस्तावित होती. आता भाजपच्या मागणीवरून या भागात आवश्यक त्या ठिकाणी ४८ इंच या आकाराची भूमिगत गटार बांधण्यात येत आहे. या कामास सुरुवातही झाली आहे.
अतिरिक्त पावसाचे पाणी विनासायास वाहून जावे, यासाठी शहरातील धारणगाव रोडवरील छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते लक्ष्मीनगरपर्यंत ३६ इंचाऐवजी आवश्यक त्या ठिकाणी ४८ इंच भूमिगत गटारीचे बांधकाम करावे, अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या माजी नगरसेविका वैशाली आढाव यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्याकडे मागील महिन्यात म्हणजे फेब्रुवारी २०२३ मध्ये एका निवेदनाद्वारे केली होती.
त्या निवेदनाची नगरपालिका प्रशासनाने दखल घेऊन छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते लक्ष्मीनगरपर्यंत प्रस्तावित ३६ इंचाऐवजी आता ४८ इंच भूमिगत गटारीचे काम करण्याचा निर्णय घेतला असून, हे काम सुरूही केले आहे. आवश्यक त्या ठिकाणी ४८ इंच भूमिगत गटारीचे काम करण्यात येत आहे.
मागील वर्षी पावसाळ्यात या भागातील बँक कॉलनी, मंजुळा अपार्टमेंट, जैन मंदिर आदी ठिकाणी घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पावसाचे पाणी जाऊन घरातील मालमत्तेसह दुकानातील सामानाचे प्रचंड नुकसान झाले होते. यापूर्वीही अशा प्रकारे नुकसान झाले होते. भविष्यात अशी परिस्थिती उदभवू नये यासाठी नगर परिषदेच्या वतीने या भागात ३६ इंची ३ फुटी भूमिगत गटारीचे काम प्रस्तावित करण्यात आले होते.
मात्र, अतिवृष्टी झाल्यास एवढ्या कमी साईजच्या गटारीतून अतिरिक्त पाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण होऊन पुन्हा मागील वर्षाप्रमाणेच परिस्थिती उदभवू नये, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान होऊ नये, यासाठी नगर परिषद प्रशासनाने छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते लक्ष्मीनगरपर्यंत ३६ इंचाऐवजी आवश्यक त्या ठिकाणी ४८ इंच ४ फूट या साईजची भूमिगत गटार करून या परिसरातील रहिवासी नागरिक व दुकानदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी नगरसेविका वैशाली आढाव यांनी केली होती.
याबाबत वैशाली आढाव यांच्यासह संगीता काला, सुभाष पाटणकर, सुवर्णा कहार, विजय दवंगे, चंद्रकांत शिंदे, सायरा तांबोळी, माधुरी अत्तरकर, विजया बोधे, श्रीकांत भास्कर, मनीषा शहाणे, उषा शिंदे, सुरेखा शेंडगे, मंगला पतंग, मंजुषा काले, संजय सोनवणे, रूचिरा लाहोटी, अंजली सोनवणे, अर्चना राका, वैशाली बडजाते, सोनल कोठारी, श्वेता कोठारी आदींनी नगर परिषद प्रशासनाला निवेदन दिले होते.
आढाव यांनी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली या भूमिगत गटारीच्या कामाविषयी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर नगर परिषद प्रशासनाने छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते लक्ष्मीनगरपर्यंत आवश्यक त्या ठिकाणी ३६ इंचाऐवजी ४८ इंच इतक्या आकाराची भूमिगत गटार बांधण्याचे काम सुरू केले आहे. या भूमिगत गटारीच्या कामाबाबत नगर परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल या परिसरातील नागरिकांनी भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलता कोल्हे व माजी नगरसेविका वैशाली आढाव यांचे आभार मानले आहेत.