डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारताचे जनक – स्नेहलताताई कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : देशाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, राजनैतिक, कायदा, कृषी, जल, विद्युत, कामगार, औद्योगिक अशा अनेक क्षेत्रात अतुलनीय योगदान देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन-दलित, उपेक्षित, शोषित समाजाच्या उद्धारासाठी फार मोठे कार्य केले आहे. देशाच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. ते खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे जनक आहेत. आपण कितीही वेळा त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन प्रणाम केला तरी ते कमीच ठरणार आहे, एवढे अनंत उपकार त्यांनी आपल्या देशावर केले आहेत, असे प्रतिपादन माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.  

भारतीय जनता पक्ष, युवा मोर्चा कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती शुक्रवारी कोपरगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त स्नेहलताताई कोल्हे यांनी कोपरगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

याप्रसंगी स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्टे विचारवंत, कृतिशील नेते होते. समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांना त्यांनी आत्मसन्मान, समानतेची संधी मिळवून दिली. ताठ मानेने जगण्याची ताकद दिली. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी  मोठे कार्य केले. आर्थिक समतेशिवाय राजकीय समता उपयोगाची नाही हे त्यांनी मनोमन जाणले होते. म्हणूनच त्यांनी सर्व घटकांचा विचार करून स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या चतु:सूत्रीचा अवलंब करणाऱ्या भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला.

संविधानाच्या माध्यमातून भारतासारख्या सर्वधर्मीय देशाला एका माळेत गुंफण्याचे अद्वितीय कार्य घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. जगातील सर्वोत्कृष्ट समताधिष्ठित राज्यघटना, भक्कम लोकशाही व्यवस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिली असून, बाबासाहेबांचे विचार व त्यांनी दिलेल्या संविधानातच समस्त देशवासीयांना पुढे घेऊन जाण्याची ताकद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा मोलाचा महामंत्र देऊन त्यांनी लाखो तरुणांना प्रेरणा दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जगातील सर्वात मोठे उच्च दर्जाचे स्मारक मुंबईतील इंदू मिल येथे उभारले जात आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान आपल्याला जपायचे आहे. त्यांनी देशाला प्रगतीकडे नेण्याचा जो विचार मांडला आहे त्यानुसार आपल्याला मार्गक्रमण करायचे आहे.

‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास,’ या त्रिसूत्रीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम करत असून, समाजातील शेवटचा माणूस आनंदात कसा राहील व स्पृश्य-अस्पृश्य हा भेद कसा दूर होईल, यासाठी ते प्रयत्न करत आहेत. मानवता धर्म हा खरा धर्म आहे. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे, माणुसकी जपावी, हा महत्त्वाचा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे तत्त्वज्ञान समजून घेऊन त्यांची शिकवण सर्वांनी आचरणात आणण्याची आज खरी गरज आहे, असे स्नेहलताताई कोल्हे यांनी सांगितले.   

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहम, शहराध्यक्ष दत्ता काले, संजीवनी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदीप नवले,विजय आढाव, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, विजय वाजे, स्वप्नील निखाडे, माजी नगरसेवक बबलूशेठ वाणी, अशोकराव लकारे, वैभव गिरमे, संदीप देवकर, कैलास खैरे, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, आरपीआयचे दीपक गायकवाड, जितेंद्र रणशूर,देवराम पगारे, बाळासाहेब नरोडे, अल्ताफभाई कुरेशी, दीपक जपे, शफिक सय्यद, शंकर बिऱ्हाडे, शाहरुख खान,

रवींद्र रोहमारे, सागर जाधव, गोरख देवडे, गोपीनाथ गायकवाड, विजय गायकवाड, रुपेश सिनगर, राजेंद्र बागुल, सुखदेव जाधव, सोमनाथ मस्के, मुक्तारभाई पठाण, इलियास खाटीक, खालिकभाई कुरेशी, फकीर मोहम्मद पैलवान, मुन्नाभाई दरपेल,गोपीनाथ सोनवणे, सलीम इंदोरी, रोहन दरपेल, पंकज मोरे, सचिन सावंत, ॲड.गणेश मोकळ, देविदास रोटे, विजय गायकवाड, निलेश डोके, पप्पू दिवेकर, संजय पवार, विजय चव्हाणके, सद्दामभाई सय्यद, समीर गवळी, वैभव आढाव, चंद्रकांत वाघमारे आदींसह भाजप, भाजयुमो,   भाजपच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी, रिपाइं (आठवले गट) तसेच दलित व आंबेडकरी चळवळीतील नेते, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.