गणेश कारखान्याच्या सभासदांचा यल्गार

कोल्हे यांनी गणेश कारखाना चालवण्याचे उत्तरदायीत्व स्वीकारावे, सभासदांची विनंती

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ : गणेश परिसराची कामधेनु असलेल्या गणेश सहकारी साखर कारखान्याचे वाटोळे करून गणेश परिसरातील शेतकरी, कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या विखे पिता-पुत्रांविरुद्ध आता सभासद शेतकऱ्यांनी यल्गार पुकारला असून, येत्या १७ जूनला होणाऱ्या निवडणुकीत कारखान्यात परिवर्तन घडवून दडपशाहीचे झाकण उघडण्याचा निर्धार सभासदांनी आज वाकडी येथे श्री खंडोबारायांच्या साक्षीने केला. गणेश कारखान्याला व त्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांना पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी सभासद शेतकऱ्यांनी या निवडणुकीत श्रीगणेश परिवर्तन मंडळाला भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन माजी महसूलमंत्री, ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले.

राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगणेश परिवर्तन मंडळाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ शुक्रवारी (९ जून) वाकडी येथील श्री खंडोबा मंदिरात माजी महसूलमंत्री, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते श्री खंडोबारायांच्या चरणी श्रीफळ वाढवून करण्यात आला. अध्यक्षस्थानी गणेश कारखान्याचे माजी संचालक ॲड.शिवाजीराव कोते होते.

या प्रचाराच्या सभेत गणेश कारखाना ताब्यात घेण्याचा विखे पिता-पुत्रांचा कुटील डाव हाणून पाडून उज्ज्वल भवितव्यासाठी गणेश परिवर्तन मंडळाला भरघोस मतांनी निवडून देण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी सर्वच वक्त्यांनी माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांनी अथक परिश्रम घेऊन गणेश कारखान्याला उर्जितावस्था प्राप्त करून देऊन तो यशस्वीपणे चालवल्याचा आवर्जून उल्लेख केला व यापुढे विवेक कोल्हे यांनी गणेश कारखाना चालवण्याचे उत्तरदायीत्व स्वीकारावे, अशी विनंती केली. 

युवा नेते विवेक कोल्हे यावेळी म्हणाले, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांचे सहकार क्षेत्रात खूप मोठे योगदान असून, त्यांनी अनेक सहकारी संस्थांची मुहूर्तमेढ रोवली व त्या नावारूपाला आणल्या. म्हणून आजही त्यांचे देशभर नाव घेतले जाते. सहकारी संस्था या शेतकऱ्यांच्या व ग्रामीण भागाच्या विकासाच्या कामधेनु असल्याने माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब व स्व. शंकरराव काळेसाहेब यांनी सहकार क्षेत्रात कधीही राजकारण आणले नाही. सदैव शेतकऱ्यांचे हित जोपासून त्यांच्या उन्नतीसाठी काम केले. गणेश कारखान्याच्या या निवडणुकीकडे आपण त्याच दृष्टीने पाहतो.

स्व.कोल्हेसाहेबांचा आदर्श जोपासत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हेसाहेब व माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व अनेक सहकारी सोसायटयांच्या निवडणूक बिनविरोध केल्या. हाच आदर्श जपत सहकारी संस्थांच्या व शेतकऱ्यांच्या विकासासाठी आपण काम करत आहोत. स्व. कोल्हेसाहेबांनी आर्थिक डबघाईला आलेला गणेश साखर कारखाना पुन्हा सुरू करून ३८ वर्षे तो यशस्वीरीत्या चालवला. गणेश कारखान्याला त्यांनी उर्जितावस्था प्राप्त करून दिली. गणेश परिसरातील शेतकरी, कामगार व अन्य सर्व समाजघटकांचे जीवन समृद्ध बनवले. ‘गणेश पॅटर्न’ म्हणून राज्यभर त्यांची प्रशंसा झाली.

सहकारात पक्ष व राजकारण न आणता संस्थेच्या व सभासदांच्या हिताचा विचार केला पाहिजे, सहकार चळवळ जिवंत ठेवली पाहिजे, या स्व. कोल्हे साहेबांच्या शिकवणीप्रमाणे गणेश परिसरातील शेतकऱ्यांची कामधेनु असलेल्या गणेश कारखान्याच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आपल्या उतरावे लागले. या भागात स्व. कोल्हेसाहेबांना मानणारे असंख्य कार्यकर्ते आहेत. त्यांना आपण कदापिही वाऱ्यावर सोडणार नाही. कायम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.

गणेश परिसरातील शेतकरी, कामगारांच्या हितासाठी व कारखान्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी सभासद मतदारांनी या निवडणुकीत गणेश परिवर्तन मंडळाला बहुमतांनी विजयी करून पुन्हा एकदा ‘गणेश पॅटर्न’ची प्रचिती आणून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. ‘गणेश’ च्या सभासद शेतकऱ्यांना उसाला चांगला भाव, साखर वाटप, कामगारांचे पगार व इतर सर्व प्रश्न निश्चितच सोडवू. सभासद शेतकरी, कामगार व सर्व घटकांना न्याय देत कारखान्याचा कारभार पारदर्शी पद्धतीने करून कारखान्याची भरभराट करू, अशी ग्वाही कोल्हे यांनी दिली.

यावेळी माजी मंत्री, ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. सुजय विखे पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर घणाघाती टीका केली. गणेश साखर कारखाना स्व.शंकरराव कोल्हेसाहेबांकडे असताना त्यांनी तो अत्त्यंत चांगला चालवला. मधल्या काळात मोठ्या माणसांनी तो चालवायला घेतला; पण त्यांच्या ‘खाबुगिरी’ वृत्तीमुळे तो नीट चालला नाही. आज या कारखान्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. त्यामुळे गणेश परिसरातील शेतकरी व अर्थव्यवस्था अडचणीत आले असून, या भागातील शेतकऱ्यांना सावरण्यासाठी मी, विवेक कोल्हे व समविचारी मंडळी एकत्र आलो आहोत. आमचा हेतू चांगला असून, गणेश कारखान्याला पूर्वीचे वैभव आणून देऊन शेतकऱ्यांना न्याय व विकास करण्याचे काम आम्ही करणार आहोत.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी तत्कालीन संचालक मंडळ व शेतकऱ्यांना वेठीस धरून गणेश कारखाना कसा ताब्यात घेतला याचा मी साक्षीदार आहे. त्यांनी हा कारखाना करार तत्त्वावर चालवण्यास घेतला व या चांगल्या कारखान्याचे त्यांनी पार वाटोळे केले. आठ वर्षांचा करार संपलेला असतानाही आता त्यांनी आपला गैरकारभार लपवण्यासाठी पुन्हा पाच वर्षांनी करार वाढवून घेतला आहे. त्यांच्या भूलथापांना, दडपणाला बळी न पडता सभासदांनी कारखान्याची सत्ता गणेश परिवर्तन मंडळाच्या ताब्यात द्यावी. आमची सत्ता आल्यास शेतकऱ्यांना योग्य हमीभाव देऊ, कारखाना चांगला चालवू, अशी ग्वाही थोरात यांनी दिली.

गणेश कारखान्याचे माजी अध्यक्ष ॲड. नारायणराव कार्ले यांनी विखे पिता-पुत्रांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे खंडन करून विखे व त्यांच्या बगलबच्च्यांनी मी भ्रष्टाचार केल्याचे पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान दिले. विखे यांनी तत्कालीन संचालक मंडळाला चौकशीच्या फेऱ्यात अडकवून २०१३-१४ मध्ये गणेश कारखाना आठ वर्षांसाठी करार तत्त्वावर चालवायला घेतला. त्यांच्या हुकूमशाहीच्या भ्रष्ट कारभारामुळे आज गणेश कारखान्यावर कर्जाचा बोजा वाढला असून, कारखान्याची अतिशय वाईट अवस्था झाली आहे. शेतकरी, कामगार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे विखे यांच्या तावडीतून हा कारखाना वाचविण्यासाठी सभासदांनी आता श्रीगणेश परिवर्तन मंडळाला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी माजी जि. प. अध्यक्ष अरुण पा. कडू, डॉ. एकनाथ गोंदकर, शिवसेनाप्रणीत शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नानासाहेब बावके, जिल्हा बँकेचे संचालक करणदादा ससाणे, सचिन गुजर, कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव कोते, शिवाजीराव लहारे, दिलीपराव सातव, सुहास वहाडणे, जयराज दंडवते, महेश लहारे, रणजीत बोठे, नानासाहेब शेळके आदींची भाषणे झाली. विखे म्हणजे साजाळलेला पापड असून, प्रवरेची ही भोकाडी आता प्रवरेला परत पाठवण्याची वेळ आली आहे. सुस्थितीत चालणाऱ्या सहकारी संस्थांचे वाटोळे करण्याची विखे घराण्याची जुनी सवय असून, गणेश परिसराची कामधेनु असलेल्या गणेश सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीतही विखे यांनी हेच केले आहे.

विखे पिता-पुत्रांचे राजकारण विकासाचे नसून, दडपशाहीचे राजकारण आहे. जनतेत दहशत पसरवून त्यांना लाचार बनवून आपला राजकीय स्वार्थ साधणाऱ्या विखे पिता-पुत्रांच्या दडपशाही व हुकूमशाहीच्या विरोधात ‘गणेश’ च्या सभासद शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. ही हुकूमशाही प्रवृत्ती गाडून टाकण्याची संधी गणेश कारखान्याच्या निवडणुकीच्या रूपाने चालून आली आहे. सभासद मतदारांनी ही संधी अजिबात न दवडता गणेश कारखान्याचे वाटोळे करणाऱ्या, गणेश परिसरातील शेतकरी, कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या विखे पिता-पुत्रांना या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक विठ्ठलराव शेळके तर सूत्रसंचालन शिवाजीराव लहारे यांनी केले.

प्रारंभी श्रीगणेश परिवर्तन मंडळाच्या सर्व उमेदवारांनी आपला परिचय करून दिला. या निवडणुकीतून माघार घेऊन श्री गणेश परिवर्तन मंडळाला पाठिंबा देणारे उमेदवार अशोक दंडवते, बालाजी थेटे, सूर्यभान गोर्डे, गजानन फोपसे, वैशाली क्षीरसागर, दिलीप क्षीरसागर, उमाकांत धनवटे, दीपक डोके, गजाप्पा गाढवे, बाळासाहेब पाळंदे, राहुल गाढवे, बलराज धनवटे, भीमराज रकटे, चंद्रकांत डोके, साहेबराव बनकर, अण्णासाहेब वाघे, नानासाहेब शेळके, सुनील थोरात, वसंत गायकवाड, अण्णासाहेब सातव आदींचा बाळासाहेब थोरात व विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सचिन चौगुले यांनी लक्षवेधी कविता सादर केली. यावेळी गंगाधरनाना चौधरी, बाभळेश्वर दूध संघाचे अध्यक्ष सुधीर म्हस्के, बाबासाहेब डांगे, दादासाहेब गाढवे, एकनाथ घोगरे, अशोकराव दंडवते, रामभाऊ बोरभणे, भीमराव लहारे, चंद्रभान धनवटे, धनंजय गाडेकर, उत्तमराव घोरपडे, निर्मळ तात्या, अनिल शेळके, महेंद्र शेळके आदींसह गणेश परिवर्तन मंडळाचे सर्व उमेदवार, गणेश परिसरातील सभासद शेतकरी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.