अमरापूरच्या रेणुकामाता देवस्थानाकातील २१ किलो चांदी, ८.७ ग्रॅम सोन्याची चोरी

शेवगाव प्रतिनिधी, दि.१८ : शेवगाव तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरापूरच्या श्री. क्षेत्र रेणुकामाता देवस्थानातील रेणुका आई साहेबांच्या मूर्तीचा लाख रुपये किंमतीचा सोन्या चांदीचा ऐवज चोरीला गेल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे.

यामध्ये १६,२४,२०० रुपये किमतीचे २१ किलो ६५० ग्रॅमचांदीचे दागिने व ५२२०० रुपये किमतीचे ८.७ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. घटनेची माहिती समजताच जिल्हाभरातून देवी भक्त मोठ्या संख्येने येथे दाखल झाले होते. या प्रकरणी देवस्थानचे पुजारी तुषार वैद्य यांचे फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, पोलीस निरीक्षक पाथर्डीचे संतोष मुटकुळे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करुन ठसे तज्ञ, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पाचारण केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप आहेर देखील आपल्या पथकासह घटनास्थळी लगेच दाखल झाले.

दरम्यान मंदिरात असलेल्या सिसीटीव्हीचे चित्रीकरण पोलिसांनी तपासले असता, त्यात एक चोरटा मूर्तीचा साज काढताना, तर दुसरा बाहेर उभा असल्याचे आढळून आले. पहाटे दीड वाजण्याच्या सुमाराला मंदिराच्या सभागृहाचे लोखंडी गेटचे कुलूप उघडून, मंदिराच्या गाभाऱ्याच्या दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत चोरी केल्याचे चित्रीकरणात दिसून आले. पहाटे सहा वाजण्याच्या सुमाराला चोरी झाल्याचे एका सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येताच त्याने  देवस्थानचे पुजारी तुषार वैद्य यांना ही बाब कळविली. दुपारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी घटनास्थळाला भेट दिली.

टोप, छत्री, मासोळ्या, पंचारती, उत्सव मूर्ती, श्रीयंत्र, सिंहासन, दंड आदी चांदीच्या वस्तू चोरीस गेल्या आहेत. मंदिर सुरक्षेचे काम एका खाजगी एजन्सीला देण्यात आले आहे. सदर एजन्सी मध्ये नियुक्तीस असलेले पाच सुरक्षा रक्षक, मंदिर व परिसरात तैनात होते. तसेच चोरी सारख्या घटना टाळण्यासाठी बसविण्यात आलेली सायरन सेन्सॉर सुरक्षा यंत्रे असताना देखील चोरी झाल्याने चर्चेला उधान आले आहे.