दुष्काळजन्य परिस्थितीची तातडीने आढावा बैठक घ्या- आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि २४ : कोपरगाव मतदार संघात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपाय योजना करण्यासाठी मतदार संघाची तातडीने आढावा बैठक घ्या अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी प्रांताधिकारी माणिकराव आहेर यांच्याकडे केली आहे. पावसाळा सुरु होवून जवळपास तीन महिन्याचा कालावधी होत असून अजूनही कोपरगाव मतदार संघात अपेक्षित पर्जन्यमान झालेले नाही. यावर्षी पावसाने मतदार संघाकडे पूर्णत: पाठ फिरविल्यामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेल्यात जमा असून संपूर्ण मतदार संघामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आहे.

भूगर्भातील पाणी पातळी खालावल्यामुळे विहिरींचे पाणी देखील कमी झाले असून असंख्य पाण्याचे स्त्रोत कमी झाले आहेत. त्यामुळे जे पाणी उपलब्ध आहेत त्या पाण्याचा पिण्यासाठी उपयोग होत आहे. येत्या काळात जर पाऊस झालाच नाही तर भीषण पाणी टंचाई बरोबर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्यांचा देखील मोठा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे त्याबाबत योग्य त्या उपाय योजना तातडीने करणे गरजेचे असून त्याची अंमलबजावणी देखील प्रभावीपणे करणे गरजेचे आहे.

शेतकरी अडचणीत असताना पावसाने उघडीप दिल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होवून खरीप हंगामाच्या आशा मावळल्या आहेत, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रभावीपणे यंत्रणा राबविणे गरजेचे आहे. दुष्काळजन्य परिस्थितीमुळे चारा पिकांचे देखील नुकसान झाले असून स्वाभाविकपणे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांवर आपले पशुधन विकून टाकण्याची वेळ येते त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी देखील उपाय योजना कराव्या लागणार आहे. शेतकरी आणि शेतमजूर यांच्या उत्पन्नाचा स्रोत थांबल्यास याबाबत काय उपाययोजना करायच्या याबाबत देखील चर्चा होणे गरजेचे आहे. 

तसेच पाण्याच्या नैसर्गिक स्रोतापासून जलसमृद्धी कशी साधता येईल याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे असून त्यासाठी मतदार संघातील जलयुक्त शिवारांच्या कामांचा आढावा घेणे गरजेचे असून त्याबाबत देखील भविष्यातील उपाययोजना करणे गरजेचे आहे.  ब्रिटिश काळापासून कोपरगाव  मतदार संघातील १६ गावे खरीप व ६३ गावे रब्बी ठरवण्यात आली आहेत. परंतु मतदार संघातील सर्वच गावात खरीप हंगामात बाजरी, मका, कापूस, तूर, सोयाबीन, भुईमुग, कांदा आदी पिके घेतली जात असून सर्वच गावांची नोंद खरीपाची होणे गरजेचे आहे त्याबाबत देखील निर्णय घेणे गरजेचे आहे.

तसेच कोपरगाव नगरपरिषद व महसूल विभागाच्या टंचाई बाबत करावयाच्या उपाय योजना तातडीने राबविण्यासाठी टंचाई आढावा बैठक घेवून त्यावर योग्य त्या उपाय योजना तातडीने करणे गरजेचे आहे. त्यासाठी दुष्काळाच्या उपाय योजना करण्यासाठी ज्या विभागांचा समावेश होतो अशा सर्व विभागांची कोपरगाव मतदार संघाची आढावा बैठक घ्यावी अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी प्रांताधिकारी माणिकराव आहेर यांच्याकडे केली आहे.