साई संजीवनी सहकारी बँक ‘वसंतदादा पाटील’ नागरी सहकारी बँक पुरस्काराने सन्मानित 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ : राज्यभरात बँकिंग क्षेत्रात आगळावेगळा ठसा उमटविणाऱ्या कोपरगाव येथील साई संजीवनी सहकारी बँकेस दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन लि., मुंबई यांच्या वतीने प्रतिष्ठेचा पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. माजी केंद्रीय रेल्वेमंत्री तथा राष्ट्रीय सहकार धोरण समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू यांच्या हस्ते साई संजीवनी सहकारी बँकेचे अध्यक्ष व युवा नेते विवेक कोल्हे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. विवेक कोल्हे यांनी हा पुरस्कार बँकेचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हेसाहेब आणि सर्व सभासद व ठेवीदार यांना समर्पित केला.

दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन लि. (मुंबई) चा रौप्यमहोत्सवी पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी (९ सप्टेंबर) नाशिक येथील गुरूदक्षिणा सभागृहात पार पडला. या सोहळ्यात राज्य सहकारी बँक्स् असोसिएशनतर्फे दिल्या जाणाऱ्या सन २०२१-२२ मधील विविध पुरस्कारांचे वितरण माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, राज्य सहकारी बँक्स् असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, उपाध्यक्ष वसंतराव घुईखेडकर यांच्या यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी रु. १०० कोटी ठेवीचे  नासिक विभाग गटात विविध आर्थिक निकषात सर्वोत्कुष्ट कामगिरी सन २०२२-२३ या वर्षात केल्याबदल कोपरगाव येथील साई संजीवनी सहकारी बँकेला नाशिक विभागातून पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार प्रदान करण्यात आला. साई संजीवनी सहकारी बँकेचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी सुरेश प्रभू यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. त्यांच्यासमवेत बँकेचे उपाध्यक्ष रेवजी आव्हाड, संचालक संभाजीराव रक्ताटे, जयंतीलाल पटेल, बापूसाहेब बारहाते, गोरखनाथ आहेर, तज्ज्ञ संचालक अशोकराव टुपके, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर सभारंजक आदी उपस्थित होते.

याप्रसंगी विवेक कोल्हे यांचे अभिनंदन करून सुरेश प्रभू म्हणाले, भविष्यात सहकार क्षेत्राला प्रगतीकडे नेण्यासाठी सहकारातील मार्गदर्शक तत्त्व अवलंबण्याची गरज असून, तंत्रज्ञान, मार्केटिंग याबरोबरच सहकाराचे चारित्र्य अबाधित ठेवणे व संस्थेचा विकास यांचा समतोल राखणे संस्थेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्त्व ठरेल. काळाबरोबर बदलण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे तितकेच महत्त्वाचे आहे. ग्राहकांशी वैयक्तिक पातळीवर नाते जोडून बँकांनी ग्राहकाभिमुखता जपावी.

सहकार हे उद्याच्या जगाचे प्रभावी माध्यम असेल. सहकार चळवळ अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी आत्मपरीक्षण करण्याबरोबरच सहकारातील सात्विकता जपावी, असेही त्यांनी सांगितले. राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे म्हणाले, सहकाराची पारदर्शकता, विश्वासार्हता आणखी गतीमानतेने वाढवण्यासाठी नागरी सहकारी बँकांनी स्वयंपूर्णतेने काम करण्याबरोबरच व्यवस्थापनातील सिद्धता, कौशल्य विकास, मूल्य व्यवस्था, सामाजिक योगदान, सामाजिक दायित्व यांचा अंगीकार करावा.

साई संजीवनी बँकेचे अध्यक्ष व युवा नेते विवेक कोल्हे म्हणाले, माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हेसाहेब त्यांनी भविष्याचा वेध घेऊन सहकारी साखर कारखानदारीबरोबरच आर्थिक पतपुरवठ्यासाठी साई संजीवनी को-ऑपरेटिव्ह बँकेची स्थापना करून बँकेच्या माध्यमातून ग्रामीण अर्थकारण मजबूत केले. शिवाय शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देत त्यांचे जीवन समृद्ध केले. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सभासद, ठेवीदार, शेतकरी हितचिंतकांच्या विश्वासाने या बँकेला प्रगतीच्या शिखराकडे नेले.

स्व. शंकररावजी कोल्हेसाहेब यांच्या आशीर्वादाने आणि संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व माजी आमदार तथा भाजपच्या नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या साई संजीवनी बँकेस सलग आठव्यांदा युनिट बँका व शंभर कोटीपर्यंत ठेवी असलेल्या बँक गटात राज्य स्तरावरील द्वितीय क्रमांकाचा सर्वोकृष्ट बँक पुरस्कार गतवर्षी मिळाला होता.

आता दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशनचा पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार मिळाल्याने बँकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. बँकेचे संचालक, सर्व ठेवीदार, सभासद, शेतकरी, हितचिंतक यांनी बँकेच्या कारभारावर दाखविलेल्या अढळ विश्वासामुळेच बँकेस आजवर अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. यापुढील काळात बँकेची अधिकाधिक प्रगती कशी होईल यासाठी आपण  प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. 

फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा, सहकार भारतीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा डॉ. शशिताई अहिरे, पुरस्कारार्थींच्या वतीने अरविंद पोरेड्डीवार, कमलादेवी विजयकुमार राठी, शरण बसवराज पाटील आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक राज्य सहकारी बँक्स् असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी तर स्वागत राज्य सहकारी बँक्स् असोसिएशनचे उपाध्यक्ष वसंतराव घुईखेडकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. चंद्रकांत संकलेचा, मंगेश पंचाक्षरी व डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले. असोसिएशनचे संचालक राजेंद्र सूर्यवंशी यांनी आभार मानले.