कोपरगाव प्रतिनिधी, दि.१ : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या समर्थनासाठी कोपरगाव येथे साखळी उपोषणाला बसलेल्या सकल मराठा समाजबांधवांची संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी मंगळवारी भेट घेऊन उपोषणाला पाठिंबा दिला. तसेच कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलता कोल्हे यांनी भ्रमणध्वनीवरून उपोषणकर्त्यांशी संपर्क साधून उपोषणाला पाठिंबा दिला.
आपण सदैव मराठा समाजासोबत असून, सरकारने मराठा समाजाला न्यायालयात कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण तातडीने देऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी कोल्हे यांनी केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. त्यांच्या समर्थनार्थ कोपरगाव शहर व तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने कोपरगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ साखळी उपोषण सुरू आहे.
माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची प्रकृती सध्या ठीक नसल्याने त्यांनी आज मंगळवारी (३१ ऑक्टोबर) भ्रमणध्वनीवरून या उपोषणकर्त्यांशी संपर्क साधून उपोषणाला पाठिंबा जाहीर केला. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी मंगळवारी सायंकाळी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला. त्यांनी उपोषणकर्ते विनय भगत, अनिल गायकवाड, बाळासाहेब जाधव, अमित आढाव, सुनील साळुंके यांच्याशी चर्चा केली.
यावेळी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब नरोडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र शिंदे, दिलीपशेठ दारुणकर, राजेंद्र सोनवणे, भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले, माजी नगरसेवक बबलूशेठ वाणी, संजय जगदाळे, नसीरभाई सय्यद, विवेक सोनवणे, अबुजर शेख, रवींद्र रोहमारे, संतोष साबळे, प्रा. दत्तात्रय गाढे, प्रा. बाळासाहेब वडांगळे, प्रा. गिरमकर, मुन्ना दरपेल, रोहन दरपेल, राजेंद्र डागा, साई नरोडे, दीपक पंजाबी, रुपेश सिनगर आदींसह मराठा समाजबांधव, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बिपीन कोल्हे म्हणाले, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागास असलेला मराठा समाज गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणासाठी लढा देत आहे. मराठा समाजातील अनेक लोक अतिशय गरीब असून, गेल्या कित्येक वर्षांपासून हलाखीचे जीवन जगत आहेत. अशा गोरगरीब मराठा समाजाला सरकारने इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायदेशीर चौकटीत कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देऊन न्याय द्यावा. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व राज्याच्या इतर भागातील मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण मिळत आहे. पण मराठवाड्यातील मराठा समाजबांधव आरक्षणापासून वंचित आहेत.
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजबांधव शांततेत राज्यभर आंदोलन करत आहेत. राज्य सरकारने आता त्यांचा संयम न पाहता तात्काळ राज्यातील सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण लागू करावे. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी व लोकप्रतिनिधींनी राजकारण बाजूला ठेवून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारवर दबाव आणावा, असे आवाहन त्यांनी केले.
स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, मराठा समाज हा जगाचा अन्नदाता असून, मराठा समाजातील बहुसंख्य लोक गेल्या अनेक वर्षांपासून शेती व्यवसाय करतात. निसर्गाच्या अवकृपेमुळे आज शेती व्यवसाय धोक्यात आला असून, मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षण मिळणे गरजेचे आहे. कोल्हे कुटुंबीय नेहमीच मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, सरसकट सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देऊन हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची विनंती आपण राज्य सरकारकडे केली आहे.
मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे व न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार सकारात्मक असून, त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊन निश्चितच न्याय देईल. आपले जीवन अनमोल आहे. त्यामुळे मराठा कुटुंबातील युवकांनी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या करू नये. तसेच शांततेत सुरू असलेल्या या लढ्याला कोणीही गालबोट लागेल असे कृत्य करू नये, असे आवाहन त्यांनी केले.