शेवगाव प्रतिनिधी, दि. ६ : तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाला योग्य भाव मिळावा यासाठी भारतीय कपास निगमच्या खरेदी केंद्राचा शुभारंभ येथील श्री मारुतराव जी घुले पाटील जिनिंग प्रेसिंग तसेच शहरातील रिद्धी सिद्धी व दुर्गा फायबर्स जिनिंग प्रेसिंग अशा तीन ठिकाणी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एकनाथराव कसाळ यांच्या हस्ते आज बुधवारी (दि ६ ) करण्यात आला.
यावेळी सी सी आयचे उद्धव कोल्हे, बाजार समितीचे संचालक हनुमान पातकळ, सचिव अविनाश म्हस्के यांच्यासह कापूस उत्पादक शेतकऱ्यांची उपस्थिती होती. या वर्षी तालुक्यात ४२ हजारावर हेक्टर क्षेत्रात कापूस लागवड झाली आहे. सध्या कपाशीला सात हजार रुपया पासून ७२०० पर्यंत भाव मिळत असल्याने शेतकरी चिंतेत होते. त्यामुळे तालुक्यात सी सी आय चे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी होती.
माजी आमदार डॉ. नरेंद्र पाटील घुले, चंद्रशेखर घुले यांनी पाठपुरावा करून ही खरेदी केंद्रे सुरू केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे जास्त मिळणार असल्याची माहिती सभापती कसाळ यांनी दिली, ज्या शेतकऱ्यांना कापूस सी सी आयला द्यायचा आहे, त्यांनी आधार कार्ड व कापूस नोंद असलेला सातबारा उतारा बँक पासबुक आय एफ एस सी कोड इत्यादी कागदपत्रांसह संपर्क करावा.
तसेच आपला कापूस विक्री सांगताना तो वाळवून आणावा. बाराच्या पुढे आद्रता असलेला कापूस घेतला जाणार नाह. अशी माहिती यावेळी कोल्हे यांनी दिली. उपस्थित शेतकऱ्यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला, सचिव म्हस्के यांनी आभार मानले.