शेवगाव प्रतिनिधी, दि. ७ : दुष्काळ जाहीर करून कापूस तूर सोयाबीन या शेतीमालाला हमीभाव वाढवून मिळावा. या मागणीसाठी तालुक्यातील गोळेगाव येथील संदीप बाबासाहेब फुंदे हा युवक शेतकरी काही ग्रामस्थ शेतकरी मित्रा समवेत सोमवार दिनांक ४ पासून गावातील मंदिरासमोर बेमुदत उपोषणास बसला आहे. आज तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी गोळेगाव येथे जाऊन उपोषणकर्त्या फुंदे यांच्या तब्बेतीची चौकशी केली. त्यांच्या मागण्याबद्दल स्वतः वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.
तसेच आपल्या कक्षेत असणाऱ्या अवकाळीचे पंचनामे उद्याच सुरु करण्याचे प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन व पीएम किसानसाठीच्या त्रुटी दूर करण्यासाठी गोळेगावातच लवकरच कॅम्प आयोजित करू. अशी ग्वाही देऊन उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली. तथापि उपोषणकर्ते सर्व मागण्या पूर्ण होई पर्यंत उपोषण सुरुच ठेवण्यावर ठाम राहिले आहेत. उपोषणाचा आज चौथा दिवस आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, तालुक्याच्या पूर्व भागातील गोळेगाव परिसरात चालू वर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने खरीपासह रब्बी पिके वाया गेली आहेत. हमीभाव नसल्याने मशागतीचा व बी-बियाण्याचा झालेला खर्च देखील निघणे अशक्य झाल्याने शेतकऱ्यांचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे. त्यातून दिलासा मिळण्यासाठी कापसाला व तुरीला १२ हजार, सोयाबीनला नऊ हजार, प्रति क्विंटल तर उसाला चार हजार रुपये प्रति टन भाव मिळावा.
तसेच इतर पिकांना दीडपट हमीभाव वाढवून द्यावा. गाईच्या दुधाला पन्नास रुपये तर म्हशीच्या दुधाला ८० रुपये प्रति लिटर भाव मिळावा. दुष्काळ तातडीने जाहीर करून शेतीपंपाचे वीज बिल व शेती कर्ज सरसकट माफ करावे. शेतीला दिवसा वीज पुरवठा करावा. अतिवृष्टीचे अनुदान तातडीने देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अशा स्वरूपाच्या मागण्याचा समावेश असून मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहिल ऊसा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे व अमोल पालवे यांनी देखील उपोषण कर्त्या शेतकऱ्यांची उपोषण स्थळी भेट घेऊन त्यांना संघटनेचा पांठिबा दिला आहे.
यावेळी माजी सरपंच विजय साळवे, संजय आंधळे, शंकर फुंदे, नवनाथ बर्डे, बाळकृष्ण फुंदे, बंडू आंधळे, बबन फुंदे, भुजंग आंधळे, अंकुश आंधळे , गणपत बर्डे, गोपीचंद धोंगडे, आनंदा उगले, महेश आंधळे, रामराव फुंदे, कचरू बडे, भारत आंधळे, नसीर शेख, भाऊसाहेब फुंदे, भिमसेन आंधळे, राजेंद्र डमाळे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.