कोपरगाव प्रतिनिधी, दि.२० : कोपरगाव शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे. या पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण लवकरात लवकर करण्यात यावे, अशी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना मिळण्यासाठी विनंती केली आहे.
स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, सर्वसामान्य लोकांना जगण्याचे बळ देणारे, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, परंपरांवर प्रहार करीत पीडित, शोषित, उपेक्षितांचे प्रश्न साहित्यातून मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी वंचित आणि तळागाळातील कष्टकरी माणसांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा दिला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात त्यांनी मोठी जनजागृती केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत व गोवा मुक्ती संग्रामात अण्णाभाऊ साठे यांनी बजावलेली भूमिका आणि दिलेले योगदान अमूल्य आहे.
त्यांनी ‘फकिरा’ सारख्या अनेक कथा, कादंबऱ्या, पोवाडे, लावण्या, लोकनाट्य असे विपुल साहित्य लेखन केले असून, त्यातून त्यांनी समाजपरिवर्तनाचा दृढ विचार मांडला. समाजपरिवर्तनात व समाजाच्या जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. अण्णाभाऊ साठे यांच्यासारखे महापुरुष हे आपल्या देशाची अस्मिता असून, त्यांच्यापासून समाजाला प्रेरणा मिळते. माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हेसाहेब यांच्या विशेष पुढाकाराने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा महाराष्ट्रात सर्वात आधी कोपरगाव शहरात उभारण्यात आला.
स्व.शंकरावजी कोल्हेसाहेबांनी स्वतः अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मगावी वाटेगाव (जि.सांगली) येथे जाऊन अण्णाभाऊंच्या कुटुंबाकडून त्यांचा फोटो मिळवला. या फोटोवरून अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा तयार करून तो कोपरगावातील मुख्य रस्त्यावर अण्णाभाऊ साठे चौकात उभारण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर महाराष्ट्रात आणि भारतात इतर ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचे पुतळे उभारण्यात आले. एवढेच नव्हे तर रशियामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
कोपरगाव शहरात मुख्य रस्त्यावर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. या ठिकाणी नगरपरिषदेच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा उभारून अनेक दिवस उलटले आहेत. पण नगरपरिषदेमार्फत अद्याप या पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण व लोकार्पण करण्यात आलेले नाही. शासनाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे त्वरित अनावरण करावे, यासाठी सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष फकिरा चंदनशिव व मातंग समाजबांधवांनी सप्टेंबरमध्ये उपोषण केले होते.
त्यावेळी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे व आपण स्वत: मातंग समाजबांधवांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा देऊन या मागण्यांची प्रशासनाने तात्काळ पूर्तता करावी, अशा सूचना न. प. मुख्याधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मातंग समाजबांधवांच्या मागण्यांबाबत आपला सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी यामध्ये लक्ष घालून गेली अनेक दिवस रखडलेले अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण तात्काळ करावे, अशी मागणी आपण त्यांच्याकडे केली असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.