लोक प्रतिनिधींचे दूर्लक्ष झाल्यानेच मतदार संघाची दुर्दशा – चंद्रशेखर घुले

शेवगाव प्रतिनिधी, दि.२९ :  एकेकाळी विविध क्षेत्रात जिल्हयात आग्रेसर राहिलेला शेवगाव तालुका सध्या सर्वच क्षेत्रात पिछाडीवर फेकला गेला असून  मुलभूत समस्यासह सर्वच क्षेत्रात तालुक्याची वाताहत झाली. लोक प्रतिनिधींचे दूर्लक्ष झाल्यानेच मतदार संघाची दुर्दशा झाली आहे. अशी घणाघाती टीका करून आपली सहनशिलता संपली असून आगामी काळात सर्व शक्ती निशी निवडणुकीला सामोरे जायचे आहे.

सध्या बुथ निहाय कमिट्याचे काम सुरु आहे. पाथर्डीत ही जायचे आहे. सर्व कार्यक्रम आजच ओपन करत नाही. आपला खटका नंतर सुरु करू. अशा त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने विधान सभेच्या निवडणुक रिंगणात उतरणार असल्याचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी स्पष्ट केले. येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात सोमवारी पार पडलेल्या युवक निर्धार परिवर्तन मेळाव्यात माजी आमदार घुले अध्यक्षपदावरून बोलत होते.

आपला काळ सुवर्ण काळ होता. तालुक्यातील सर्व जनता हे आपले कुटूंब समजून लोकनेते स्व. मारुत घुले यांनी राजकारणा पेक्षा समाज कारणाला महत्व देऊन आयुष्य भर काम केले त्याचमार्गाने घुले कुटुंबीयाची कार्यपद्धत आहे. मात्र, सध्या मतदार संघात भूलभूलैया पद्धतीने मूळ समस्यांना बगल देऊन केवळ राजकारण डोळ्यासमोर ठेवून विकास कामांचा डांगोरा पिटविला जात आहे.

त्यामुळे दोन्ही तालुक्याच्या जनतेत मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे. म्हणूनच कार्यकर्त्यांना उर्जा देण्यासाठी निर्धार पूर्वक कटीबध्द झालो आहे.
माजी सभापती डॉ क्षितीज घुले म्हणाले, राजकीय पद असो वा नसो घुले परिवार सतत जनतेसोबत असल्याने कार्यकर्त्यांना नवीन उर्जा मिळावी यासाठी, ‘युवक निर्धार परिवान’ मेळाव्याचे आयोजन केले आहे.

यावेळी बीडचे समाज प्रबोधनकार डॉ. ज्ञानदेव काशिद, सुशिल शेळके यांनी गावागावातील बुथ निहाय, तसेच बुथ प्रमुख, ग्राम समन्वयक व तालुका समन्वयक या धर्तीवर कृतीशील कार्यकर्त्यानी नेत्यांचे कार्य, त्यांच्या कामाचा प्रचार आणि प्रसार घर तेथे कार्यकर्ता या संकल्पनेच्या माध्यमातून राबवावा. त्यातून मिळणाऱ्या यशापासून कोणीही तुम्हाला रोखू शकत नाही. असे सांगून बुथ कमिटी बाबत सविस्तर माहिती दिली.

राष्ट्रवादी युवक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. ज्येष्ठ नेते दिलीप लांडे, काकासाहेब नरवडे, अरुण लांडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार मुंढे, रामनाथ राजपुरे, कैलास नेमाणे, ताहेर पटेल, बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ, उपसभापती गणेश खंबरे, मोहन गलांडे, देविदास पाटेकर, राजेंद्र दौंड, चांद मणियार, यांचे सह गावोगाव चे बुथ कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

शाहीर राजेंद्र कांबळे व सहकारी पथकाने सादर केलेल्या महाराष्ट्र गिताने ‘परिवर्तन’ मेळाव्यास प्रारंभ झाला. संजय कोळगे यांनी सुत्रसंचलन केले. तर राहूल देशमुख यांनी आभार मानले. माजी आमदार चंद्रशेखर घुले संपूर्ण शक्तिनिशी विधान सभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार अशी चर्चा सध्या मतदार संघात चांगलीच रंगली होती. आजच्या युवक मेळाव्याने त्यावर शिक्का मोर्तब झाले.

याशिवाय पाथर्डीत शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची ॲड प्रताप ढाकणे यांच्या युवक यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने जाहीर सभा असतांना त्याचवेळी शेवगावी घुले यांनी ‘युवक निर्धार परिवर्तन’ मेळाव्याचे आयोजन केल्याने देखील अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. त्याचेही निराकरण अन्य वक्त्याच्या भाषणाने स्पष्ट झाले. आगामी निवडणुकीत कोणत्या पक्षाकडून घुले उभे रहाणार याचा विचार न करता घुले हाच आपला पक्ष समजून कामाला लागा असे अवाहन वक्त्यांनी केले आहे.