बोधेगावात भरदिवसा घरफोडी दोन लाखाच्या ऐवजाला गंड

शेवगाव प्रतिनिधी, दि.०८ : तालुक्यातील बोधेगावच्या पैठण-पंढरपुर पालखी मार्गालगत असलेल्या बाळासाहेब लक्ष्मण सावळकर यांच्या घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून आतील सोने, चांदी, दागिने आणि रोख रक्कम असा दोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी बुधवारी भरदिवसा लांबविला. आठवडयातील ही दूसरी घटना असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमते विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

याबाबात माहिती अशी कि, बोधेगावपासून दोन किलोमीटर वर सावळकर यांची पालखी मार्गालगत शेतात वस्ती आहे. शेजारीच त्यांचा मोठा भाऊ बाबा सावळकर यांचे हॉटेल असून बाळासाहेब यांची पत्नी अनिता, आई इंदुबाई ह्या काही मजुरांसमवेत शेजारीच ऊसाच्या शेतात खुरपण्यासाठी गेल्या होत्या. नेहमी प्रमाणे बाळासाहेब दुपारी सव्वाचारच्या दरम्यान घरातुन बाहेर पडले परंतु साडेचारच्या दरम्यान शेळीला घेऊन माघारी आले असता त्यांना घराचे दरवाजे उघडे तर खोलीतील लोखंडी कपाटातील कपडयाचा अस्थव्यस्त पडलेला पसारा आणि तुटलेले लॉक दिसुन आल्याने चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

मराठवाड्याचे प्रवेशद्वार असल्याने येथे चोऱ्याचे प्रमाण अधिक आहे. गोदावरीचा गंगा काठ जवळ असल्याने वाळूच्या तस्करीचे बोधेगाव मोठे केंद्र बनले आहे. त्यामुळे येथे गुन्हेगारांची वर्दळ असते ही वस्तुस्थिती असल्याने नेहमीच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने बोधेगावी पोलिस स्टेशन होणे गरजेचे आहे. – संतोष केसभट तालुका चिटणीस भाजपा. 

कपाटातील एक तोळ्याचे नेकलेस, ५ ग्रॅमचे झुंबर, ५ ग्रॅमचे वेल, पत्तामणी पोत ७ ग्रॅम, ओम दिड ग्रॅम, चार भारा च्या चांदीच्या साखळ्या, कडे, जोडे तर २० हजाराची रोकड असा दोन लाखापर्यंतचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. घटनेची माहिती समजताच बोधेगाव पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस कॉन्स्टेबल दिलीप राठोड, पोलिस नाईक सुखदेव धोत्रे यांनी घटनास्थळी भेट दिली.

या अगोदर नुकतीच शेवगाव-गेवराई रस्त्यावरील मारुती वस्तीवरील रामनाथ ढेसले यांच्या घरातून पाच लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली असतांना आता दुसऱ्यांदा त्याच पद्धतीची घटना घडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. परिसरात सध्या सुरु असलेले चोर्‍यांचे सत्र पहाता  सामान्यांची सुरक्षा रामभरोसे झाल्याची नागरिकांची भावना झाली आहे.