कोपरगाव प्रतिनिधी, दि.१२ : शिर्डी येथील साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या निवडणुकीत विखे पाटील पिता-पुत्रांच्या दोन्ही पॅनलचा दारुण पराभव झाला आहे. कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वात परिवर्तन मंडळाने निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवला आहे. या निवडणुकीवर लक्ष ठेऊन पडद्यामागून सूत्रे हलवणारे युवा नेते विवेक कोल्हे यांनी विखे पाटील यांना होम पिचवर पुन्हा एकदा दणका दिला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, या निवडणुकीत परिवर्तन मंडळाला प्रामाणिक साथ देणारे ‘किंगमेकर’ ठरलेले विवेक कोल्हे हे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
गणेश साखर कारखाना सुरळीत चालू नये. म्हणून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आडकाठी आणत असल्याचे आरोप त्यांच्यावर अनेकदा होता आहेत. त्यातच साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑप. सोसायटीच्या निवडणुकीत परिवर्तनाला सर्वार्थाने बळ देणारे विवेक कोल्हे यांनी निकालानंतर आपले पत्ते उघड करत दुसरा मेसेज दिला असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहे.
विवेक कोल्हे यांनी गणेश कारखान्यात सत्ता परिवर्तन घडवून विखे यांच्या गटाच्या ताब्यातून कारखाना खेचून आणला होता. त्यानंतर आता साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा विखे पाटील पिता-पुत्रांना मोठा धक्का दिला आहे. विखे पाटलांच्या दहशतीच्या विरोधात शिर्डी मतदारसंघात तीव्र असंतोष असून, गणेश कारखाना, ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आता साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीत विखे पाटलांच्या पॅनलचा दारूण पराभव झाल्याने त्याची प्रचिती आली आहे. यापुढील काळातही विखे यांना अशा अनेक धक्क्यांना सामोरे जावे लागणार असल्याची चर्चा शिर्डी मतदारसंघात रंगली आहे.
या निवडणुकीचे नेतृत्व करणारे कामगार नेते विठ्ठल पवार यांच्यासह परिवर्तन पॅनलचे महादू कांदळकर, कृष्णा आरणे, भाऊसाहेब कोकाटे, संभाजी तुरकणे, देविदास जगताप, पोपट कोते, विनोद कोते, मिलिंद दुनबळे, तुळशीराम पवार, रवींद्र गायकवाड, भाऊसाहेब लवांडे, इकबाल तांबोळी, गणेश अहिरे, सुनंदा जगताप, लता बारसे हे सर्व १७ उमेदवार बहुमतांनी विजयी झाले आहेत. या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावून विखे पाटलांना पुन्हा एकदा आसमान दाखविणारे विवेक कोल्हे यांची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे.