शेवगाव प्रतिनिधी, दि.१९ : भारत सरकारच्या न्याय व विधी विभागाने नोटरी पब्लिक म्हणून निवड केलेल्या वकिलांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. यात शेवगाव न्यायालयात वकिली करणाऱ्या तब्बल १३ वकिलांची नोटरी पब्लिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
निवड झालेल्या वकिलांनी मागील वर्षी ऑनलाईन मुलाखती दिल्या होत्या. त्याचा निर्णय देखील न्याय व विधी विभागाने ऑनलाइन यादी प्रसिद्ध करून नुकताच जाहीर केला आहे. शेवगाव न्यायालयातील ॲड.महेश आमले, ॲड. मिनीनाथ देहाडराय, ॲड. अमोल जाधव, ॲड. अमोल वेलदे, ॲड. अतीश लांडे,
ॲड. संदीप बर्डे, ॲड. शिवाजी भोसले, ॲड. रामदास बुधवंत, ॲड. जयप्रकाश देशमुख, ॲड. इम्तियाज पठाण, ॲड. मनोहर थोरात, ॲड. अभिजीत काकडे व ॲड.किरण अंधारे यांची यावर्षी नोटरी पब्लिक म्हणून नियुक्ती झाली आहे. हे सर्व विधिज्ञ येथे दहा ते पंधरा वर्षापासून आपल्या वकिली व्यवसायात कार्यरत आहेत.
शहर टाकळी विकास सेवा सोसायटी व समस्त ग्रामस्थाच्या तसेच हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने शहरटाकळीचे भूमिपूत्र ज्येष्ठ ॲड. आमले यांची नोटरी पब्लिक पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सोसायटीचे चेअरमन ॲड.अनिल मडके, व्हाईस चेअरमन दिलीप राजळे, वाय डी कोल्हे यांचे हस्ते सन्मान करण्यात आला आहे.