शेवगाव प्रतिनिधी, दि.२३ : येथील ईदगाव मैदानाजवळ, एका गटाकडून झालेल्या मारहाणीत दोन युवक जखमी झाल्याची घटना, शुक्रवारी(दि.२२) दुपारच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मध्ये पाथर्डी तालुक्यातील पाच जणांचा समावेश आहे.
या प्रकरणी हर्षद अल्ताफ इनामदार, (वय २२ वर्ष, रा. इंदिरानगर, शेवगाव) याने दिलेल्या फिर्यादी वरुन झहीर उर्फ जज्जा शेख (रा. शेवगाव) मज्जू उर्फ मुद्दसर साजीद सय्यद (१९ वर्षे), पाप्या उर्फ परवेश शेख (२१ वर्षे), अरमान उर्फ सर्फराज गणी पिंजारी (२० वर्षे), शाहरुख शेख, वसीम शेख वरील सर्व रा. मोहटादेवी रोड, पाथर्डी यांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न कलामासह, विविध कलमान्वये, शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी मध्ये म्हटले की, ईदगाह मैदानाजवळील चायनीज हॉटेल समोर बंधू अरबाज यांचे समवेत गप्पा मारत बसलेलो असताना, आरोपी तिथे दाखल झाले. यातील जहीर उर्फ जज्जा याने, ‘आमचे पैसे कधी देणार, जास्त चरबी चढली आहे का ?, असे म्हणत मागील भांडणाची कुरापत काढीत, जहीर याने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने पोटाजवळ व अरबाजच्या पायावर मारहाण केली.
यावेळी जहीर याने हातातील लोखंडी रॉड फेकून देत कंबरेचा चॉपर काढून अरबाज याच्या मानेवर मारण्याच्या उद्देशाने वार केला असता, अरबाज याने मान बाजूला करीत हातवर चॉपरचा वार अडवला, त्यामुळे त्याच्या हाताला दुखापत झाली आहे. यावेळी इतर आरोपींनी लाकडी दांडक्याने दोघांना मारहाण केल्याचे फिर्यादी मध्ये म्हटले आहे.
शेवगाव पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून, संबंधित आरोपींपैकी मुद्दसर साजीद सय्यद, परवेश शेख, सर्फराज गणी पिंजारी या तिघांना शनिवारी (दि.२४) रोजी अटक केली आहे.