कोपरगाव प्रतिनिधी, दि.२६ : नाशिक शिक्षक मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार आमदार किशोर दराडे यांचे बंधू आमदार नरेंद्र दराडे थेट महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. संदीप गुळवे यांच्या मतदान बुथवर ठाण मांडून बसल्याने आमदार दराडे हे आपल्या बंधुसाठी प्रयत्न करीत आहेत की, विरोधी उमेदवार संदीप गुळवे यांच्यावतीने मतदान करून घेण्यासाठी मतदान केंद्रावर ठाण मांडून बसले आहेत का? असा सवाल उपस्थित झाला.
बुधवारी २६ जून रोजी नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान असल्याने आमदार नरेंद्र दराडे हे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्या मतदार संघातील तहसील कार्यालयाच्या आवारातील बुथवर आले होते. सकाळी आठ वाजता कोपरगाव येथे आल्या बरोबर आमदार नरेंद्र दराडे हे आपले बंधू उमेदवार असलेल्या महायुतीच्या बुथवर जावून मतदान प्रक्रिया व इतर व्यवस्थेचा आढावा घेतला.
कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्यावतीने बैठक व्यवस्था केलेल्या ठिकाणी आमदार नरेंद्र दराडे जावून बसले. तेथील कार्यकर्त्यांच्या कानात कुजबुज करीत माहीत घेतली आणि थेट समोर असलेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार अर्थात आमदार किशोर दराडे यांच्या विरोधातील उमेदवार ॲड. संदीप गुळवे यांच्यासाठी काम करणारे उध्दव ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जावून बसले.
तिथे संबंधीत कार्यकर्त्यांसमवेत गप्पा मारत मतदानाला येणाऱ्या जाणाऱ्या शिक्षकांकडे पहात बसले. मतदान करण्यासाठी येणारे अनेक शिक्षक नरेंद्र दराडे यांना विरोधी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांच्या समवेत बसल्याचे पाहुन चकीत झाले. उमेदवार किशोर दराडे यांच्या विरोधात त्यांचे बंधू नरेंद्र दराडे खरच काम करीत आहेत की काय अशी शंका अनेक शिक्षकांना आली. तर यावेळी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी नरेंद्र दराडे यांच्या भूमीकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत दराडे बंधूंवर निशाणा साधला.
दरम्यान नाशिक शिक्षक मतदार संघातील महायुती शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे आहेत तर विधान परिषदेचे आमदार नरेंद्र दराडे हे ठाकरे सेनेचे आमदार आहेत. नरेंद्र दराडे यांची राजकीय भूमिका वेगळी आहे तर त्यांचे बंधू किशोर दराडे यांची राजकीय भूमिका वेगळी दिसत असली तरीही शेवटी दोघा बंधूंच्या राजकीय महत्वाकांक्षा एकच आहे. कोणी कोणत्याही पक्षात जा पण आमदार व्हा ही निती दराडे बंधूंनी वापरली असल्याने दोन राजकीय विरोधात दराडे बंधुंची भूमिका चकीत करणारी आहे. नरेंद्र दराडे यांची भूमिका येत्या १ जुलैच्या निकालातून अधिक स्पष्ट होईल.