विरोध झाला, पण साठवण तलाव पुर्ण केला – आशुतोष काळे 

 दिलेला शब्द पाळला पाणी प्रश्न सोडवला

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ : अनेकांचा विरोध झुगारून, कोर्ट कचेऱ्या करीत कोपरगावच्या नागरिकांसाठी पाच नंबरचे साठवण तलाव निर्माण केले. आता कोपरगावच्या नागरीकांना मुबलक पाणी मिळणार त्याचा शुभारंभ येत्या रविवारी १५ सप्टेंबर रोजी करणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी पञकार परिषद घेवून माहीती दिली. शहरातील साईबाबा तपोभूमी येथील सभागृहात आमदार आशुतोष काळे यांनी सोमवारी दुपारी पञकार परिषदेचे आयोजन करुन पाचव्या नव्या साठवण तलावा संदर्भात माहीती दिली.

यावेळी ते म्हणाले की, मी आमदार होण्यापूर्वी कोपरगावच्या पाण्यासाठी संघर्ष करीत ९ दिवस उपोषण करीत शासनाचे लक्ष वेधले होते. त्याचवेळी नागरीकांना  शब्द दिला होता की, मला आमदार केले तर पाणी प्रश्न सोडणार आज तो शब्द पुर्ण करीत कोपरगाव नगरपालीकेच्या येसगाव येथे नवीन पाचव्या साठवण तलावाची निर्मीती केली. हे नवीन तलाव पुर्ण होवू नये यासाठी विरोधकांनी सुरुवातीपासून विरोध केला. विविध नावाने कोर्टात दावे दाखल केले. आत्तापर्यंत २२ वेळा तारखा झाल्या. मोठमोठ्या वकीलांची फौज लावली तरीही आपण या नव्या तलावाचे काम पुर्ण करुन दाखवले. केवळ दाखवले नाही तर येत्या १५ सप्टेंबर रोजी जलपूजन करुन कोपरगावच्या नागरीकांना पाणी मिळणार आहे. 

 यापूर्वी नगरपालीकच्या चार तलावात जितका पाणी साठा होता तितकाच साठा एकट्या पाचव्या नव्या तलावात होणार आहे. पाण्याचा साठा वाढल्याने आता आठदिवसाड मिळणारे पाणी दोन किंवा तीन दिवसाने देता येईल. जर शहरातील वितरण व्यवस्था बदलली तर दररोज पाणी मिळू शकते अशी व्यवस्था आपण करीत आहोत. पाचव्या तलावामुळे कोपरगाव नगरपालीकेचे अर्थात नागरीकांच्या कराचे २० कोटी रुपये वाचवले. जर पालीकेला १३१ कोटी रूपये योजनेसाठी १५ टक्के  रक्कम भरावी लागणार होती अर्थात २० कोटी भरावे लागले असते. पण राज्य शासनाकडे पाठपुरावा केल्याने ते पैसे वाचले केवळ पैसेच वाचले नाहीत तर हि योजना पुर्ण होण्यासाठी १० वर्षे लागली असती.

तलाव खोदाईच्या कामात सुरुवातीची माती समृध्दी महामार्गासाठी उचलल्यामुळे १० कोटी रुपये वाचवले त्याच पैशातून शहरातील वाढीव भागात पाईप लाईन करता आली. येथीही विरोधकांनी माती उचलण्यासाठी कसा विरोध केला हे सर्वश्रुत आहे. विरोधकांचा विरोध झुगारुन साठवण तलाव निर्माण करण्यात यशस्वी झालो. केवळ तलावाचे काम पुर्ण करुन थांबलो नाही तर धरणातील पाण्याचे आरक्षण वाढवून घेतल्याने आपल्याला पाणी भरपूर मिळणार आहे. दर दिड महिन्याला कालव्याला पिण्याच्या पाण्याचे आवर्तन पाटबंधारे विभागा सोडणार आहे.

शहरातील महीला भगिनींची पाण्यामुळे होणारी हाल मला पहावत नव्हती. रस्त्यावर,अंगणात गल्ली बोळात जिथे पहावे तिथे पाण्याच्या टाक्या, टिपडे, डबे  पाणी भरण्यासाठी ठेवल्याने रस्त्यावरुन जाता येत नाही अशी भयानक स्थिती शहरात झाली. कष्टकरी महीलांची पाण्यामुळे होणारी हाल मनाला वेदना देणारी होती. नागरीकांच्या वेदनांची जाणिव ठेवून पाचव्या साठवण तलावाचे काम गतीमान केलो असे म्हणत आमदार काळे यांनी आपल्या भावना व्यक्त करीत विरोधकांनी पाण्याला विरोध कसा केला याचा पाढा वाचून दाखवला. या पञकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनिल गंगुले, ॲड. विद्यासागर शिंदे, माजी नगरसेवक मंदार पहाडे, माजी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, शैलेश साबळे, रमेश गवळी यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 १३१ कोटी नव्या वाढीव पाणीपुरवठा योजनेतील पाचव्या साठवण तलावाचे आकर्षण सर्वांना होते. तलाव पुर्ण होणार की, चौथ्या तलावासारखे कोणी तरी आडकाठी आणणार माञ आमदार आशुतोष काळे यांनी तलावाच्या कामाला प्राधान्य देवुन तलाव पुर्ण केला आणि त्याचे पाणी सुध्दा पिण्यासाठी सोडण्याचा मुहूर्त काढल्याने तलावावरील चर्चेला काळेंनी पुर्ण विराम देत विरोधकांची बोलती  बंद केली अशी काळेंच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली आहे.