जाणता राजा पासुन सर्वांनी महानंद दूध संघाचं वाटोळं केल – राधाकृष्ण विखे पाटील 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २१ : राज्यातील दूध व्यवसायाला बळकटी देणाऱ्या महानंद दूध संघाला राज्यातील एकाही राजकीय नेत्यासह कोणीच सावरु शकले नाहीत. १० लाख लिटर दररोज दूध संकलन करणारा महानंद दूध संघ केवळ ४० हजार लिटरवर आला. महाराष्ट्राचे जाणते राजे पासुन सगळे थकले. सगळ्यांनी महानंद दूध संघाचं वाटोळं केलं.  त्यांचेच सगळे  शिष्य महानंद दूध संघावर होते असे म्हणत महानंद दूध संघाचे वाटोळे करण्यात शरद पवार यांचा अधिकचा वाटा असल्याची टिका तत्कालीन दुग्धविकास मंत्री तथा विद्यमान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी  कोपरगाव येथे एका कार्यक्रमात केली.

  कोपरगाव येथील गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील शेतकरी सहकारी दूध उत्पादक संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध प्रकल्पांचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला यावेळी ते प्रमुख उद्घाटन म्हणून बोलत होते. विखे पाटील पुढे म्हणाले की, महानंद दूध संघ हा गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात चालु होता.‌ राज्यातील सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महसंघ अर्थात महानंद दूध संघाची ओळख राज्यासह देशाला होती.

महानंद दूध संघामुळे ग्रामीण भागातील दूध उत्पादक व शेतकऱ्यांमध्ये धवल क्रांती झाली. पश्चिम महाराष्ट्रात दुध संकलन सर्वाधीक होत असल्याने येथे दुध व्यवसाय शेतकऱ्यांसाठी जोड धंदा आहे. उलट विदर्भ व मराठवाड्यातील ११ जिल्हे मिळून १० लाख लिटर दूध संकलन रोज होते, तर एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यात ५३ लाख लिटर दूध संकलन दररोज होते. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळ पडला तरी दूध धंद्यामुळे येथील शेतकरी आत्महत्या केली नाही.

या भागात धवल क्रांती झाली. महानंद दूध संघ तोट्यात चालत होता. मदर डेअरी महानंद दूध संघ चालवायला घेतल्यापासुन दूध संकलन वाढले आहे. त्याचा फायदा राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. मदर डेअरी हि गुजरातची नसुन ती भारत सरकारची आहे असे म्हणत महानंद दूध संघ गुजरातला पळवला या विरोधकांच्या आरोपाला राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा एकदा उत्तर दिले. 

  दरम्यान महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ अर्थात महानंद हा दूध संघ २ मे २०२४ रोजी भारत सरकारच्या राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याची कारवाई सुरु झाली.‌  भारत सरकारच्या मदर डेअरीने राज्य सरकारकडून महानंदा हस्तांतर करून घेण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारकडे २५३ कोटी ५७ रुपयाचे  भागभांडवल मागितले होते.‌ तसेच महानंद दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची अट घातली होती त्यानुसार महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे सह १८ संचालकांनी संबधीतांकडे दिल्याने मदर डेअरी महानंद चालवण्यासाठी तयार झाली.

महानंद दूध संघाची स्थापना १९६७ साली झाली होती. राज्यात महानंद दूध संघामुळे ग्रामीण भागातील सहकारी दूध संघांना चालना मिळत गेली. सन २००४ पर्यंत महानंद नफ्यात चालत होता नंतरच्या काळात राज्यातील दूध संघानी स्वत:च्या नावाने दूध पिशव्या निर्माण करुन बाजारपेठत विक्री सुरू केली आणि महानंद दूध संघाची उतरती कळा सुरु झाली.  २००४ ते २०१६ या बारा वर्षात महानंद दूध संघाचे बारा वाजले. उत्पन्न कमी खर्च जास्त अशामुळे महानंद दूध संघ पुरता बुडत गेला.

अखेर राज्याची हि शिखर संस्था वाचवण्यासाठी विरोधकांना न जुमानता राजेश परजणे व त्यांच्या संचालक मंडळाने धाडस करून एकमुखी निर्णय घेतला आणि मदर डेअरीच्या सहकार्याने फायद्यात चालण्याची आशा वाढवली आहे. राज्यातील दूध व्यवसायाला आता मदर डेअरीची साथ लाभल्याने डबघाईतील हा नाशवंत दूग्धव्यवसाय भरारी घेईल हि आशा शेतकरी व दूध व्यवसायीकांची आहे.

Leave a Reply