शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ : सर्व जगाने आपल्या देशाच्या लोकशाही समाज व्यवस्थेचे कौतुक केले असून प्रत्येक नागरिकाला मिळालेला मतदानाचा अधिकार हा अनमोल आहे. मतदानामुळे प्रत्येक नागरिकाला त्यांचे हक्क आणि कर्तव्य बजावण्याची मोठी संधी मिळत असून ग्रामपातळीपासून केंद्रीय स्तरावर होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन तहसीलदार छगनराव वाघ यांनी केले.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शेवगावासह तालुक्यात पार पडलेल्या मतदार जनजागृती अभियान अंतर्गत आयोजित कार्यक्रमात तहसीलदार वाघ बोलत होते.
या निमित्त येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अॅड सायन्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती फेरीचे आयोजन केले होते. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून नागरिकांना मतदानाचे महत्व विषद केले. तर आबासाहेब काकडे विद्यालयातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मतदान दिनाची शपथ देण्यात आली. तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाच्या वतीने पार पडलेल्या केंद्र निहाय निबंध, वकृत्व, चित्रकला, घोषवाक्य व रांगोळी स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थी व विद्यार्थ्याचा बक्षीस व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.
तहसीलदार वाघ, प्रशिक्षणार्थी तहसीलदार राहुल गुरव, नायब तहसीलदार मयूर बेरड, रविंद्र सानप, पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते यांच्यासह निवडणूक विभागाचे श्रीकांत गोरे, रमेश गोरे, व अधिकारी कर्मचारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे, प्रा. मीनाक्षी चक्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती.