शेवगाव प्रतिनिधी, दि. ३ : लोक न्यायालयात दाव्याचा निकाल झटपट दिला जातो. न्यायालयात हेलपाटे मारून पायऱ्या झिजवाव्या लागत नाहीत. दोन्ही पक्षांना समाधान मिळते. आपसातील द्वेष वाढत नाहीत आणि विशेष म्हणजे लोक न्यायालयाच्या निकाला विरुद्ध अपील नाही एकाच निर्णयात न्यायालयाच्या दगदगीतून सुटका होते. दोन्ही पक्षकारातील वैरभाव कमी होतो. सर्वांचाच वेळ, शक्ती आणि पैसा देखील वाचतो. म्हणून जास्तीत जास्त पक्षकारांनी लोक न्यायालयाचा लाभ घ्यायला हवा असे आवाहन शेवगावच्या प्रधान न्यायाधिश संजना जागुष्टे यांनी येथे केले.
किरकोळ कारणावरून अनेकदा विविध स्वरूपाचे वाद निर्माण होतात. यशश्वी मध्यस्थी केल्यास दोन्ही पक्षांना समजावून सांगितल्यास ते वाद मिटवता येतात. लोक न्यायालयाची ही भूमिका समजावून सांगण्यासाठी तालुक्यातील भगूर येथे तालुका विधी सेवा समिती व शेवगाव वकील संघाच्या वतीने आयोजित विशेष शिबिरात त्या बोलत होत्या.
न्या . जागुष्टे पुढे म्हणाल्या, वाद उद्भवला तर तो सामंजस्याने सोडवावा अशी आपली प्राचीन परंपरा आहे. पूर्वी गावातील जुनी जाणती माणसे एकत्र येत आणि कोणामध्ये उद्भवलेला कुठल्याही स्वरूपाचा वाद. समजून घेत तो मिटवीत. निवाडा करणारे त्या गावातील आदरणीय आणि नि :पक्षपाती लोक असत. त्याचेच आधुनिक स्वरूप म्हणजे ” वैकल्पिक वाद निवारण ” पद्धत होय.
काळाची गरज ओळखून दिवाणी प्रक्रिया संहितेमध्ये कलम ८९ नुसार दुरुस्ती करण्यात आली असून या कलमानुसार सुसंवाद समेट व संमतीने लवाद यंत्रणेस एक कायदेशीर स्थान देण्यात आले आहे .न्यायालयातील प्रलंबित खटले सामोपचाराने व समझोत्याने तडजोड होऊन मिटावीत व ज्या खटल्यामध्ये तडजोडीची शक्यता आहे ते प्रकरण लवकरात लवकर निकाली व्हावे हा या दुरुस्ती मागचा उद्देश आहे.
वैकल्पिक वाद निवारण म्हणजे दोन्ही पक्षांनी संमती दिलेल्या ठरावानुसार वाद मिटविण्यासाठी तसेच पुढील वाद टाळण्यासाठी दोन्ही पक्षकारांना मान्य असेल अशा प्रकारच्या मध्यस्थीने दिलेल्या निवाड्यावरील आदेश तसेच कायदेशीर बांधिलकी देणाऱ्या या विकसित प्रक्रियेला वैकल्पिक वाद निवारण (ए डी आर ) असे म्हणतात. असे सांगून या मध्यस्थीमुळे समेटमध्ये जिंकलो, हरलो हा भाव राहत नाही. व दोन्ही पक्षकार तडजोडीने निकाल झाल्याने समाधानी होतात. सामाजिक स्वास्थ्य व नैतिकता वाढीस मदत होते. तसेच या प्रकारात न्यायालयावरील कामाचा ताणही कमी होतो.
यावेळीसह दिवाणी न्यायाधीश श्रीमती व्ही .बी . डोंबे,सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती एम ए बेंद्रे, वकील संघाचे अध्यक्ष विधिज्ञ रामदास बुधवंत , उपाध्यक्ष विधिज्ञ विजय भेरे, सचिव विधिज्ञ संभाजी देशमुख, विधिज्ञ अविनाश शिंदे, विधिज्ञ बाबासाहेब अंधारे, विधिज्ञ मनोहर थोरात, सरपंच कोमलताई पुरनाळे, वैभव पुरनाळे ग्राम सेविका पाचारणे व ग्रामस्थांची उपस्थिती होती. विधिज्ञ दादासाहेब शेळके यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक वकील संघाचे माजी अध्यक्ष के. के. गलांडे यांनी केले. विधिज्ञ किरण अंधारे यांनी सुत्रसंचलन केले . ढोले यांनी आभार मानले.