कोपरगाव प्रतिनिधी, दि. २०: अपघातात अथवा आजारामुळे दुर्दैवाने हात, पाय गमावलेल्या दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयवांचे बळ देण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी कम्युनिटी फिजिओथेरपी विभाग मुंबई, साधू वासवानी मिशन पुणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहमदनगर, के.जे. सोमैया महाविद्यालय कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आ.आशुतोष काळे व महाराष्ट्र नवनिर्माण दिव्यांग सेना अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल यांच्या सहकार्यातून रविवार (दि.२५) रोजी सकाळी ८.३० ते दुपारी २.०० या वेळेत के.जे. सोमैया महाविद्यालय कोपरगाव येथे मोफत कृत्रिम अवयव व फिजिओथेरपी कॅम्प आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांच्या वतीने देण्यात आली आहे.
अपघातात अनेक नागरिकांना हात-पाय गमवावे लागतात तसेच विविध आजारांमुळे देखील हात पाय गमावलेल्या व्यक्ती सर्वसामान्य जीवन जगू शकत नाही त्यावेळी त्यांना दुसऱ्या व्यक्तीचा आधार घेवून जीवन व्यतीत करावे लागते. अशा कोपरगाव मतदार संघातील व्यक्तींसाठी आ.आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून कृत्रिम अवयवांचे बळ मिळणार आहे.
रविवार रोजी होणाऱ्या कँपमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून हात पाय गमावलेल्या दिव्यांगांची तपासणी व आवश्यकतेनुसार हात-पायांचे माप घेण्यात येणार आहे. शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर तपासणीबरोबरच मार्गदर्शन देखील करणार आहेत. तपासणी नंतर ज्या दिव्यांग बांधवांना आवश्यकतेनुसार काही कालावधीनंतर कृत्रिम हात-पायांचे वितरण करण्यात येणार आहे. शरीराचे महत्वाचे अवयव नसल्यामुळे जगण्यात अडचणी येत असलेल्या दिव्यांग बांधवांना कृत्रिम हात-पायांच्या मदतीने सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगण्यास मदत होणार आहे.
या व्यक्ती सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे चालू फिरू शकनार आहे. या कँपच्या माध्यमातून अपंग नागरिकांना सामान्य जीवन जगण्याची मदत व नवी उमेद मिळवून देण्याचा आ.आशुतोष काळे यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा असे आवाहन आ.आशुतोष काळे व दिव्यांग सेना अहमदनगरचे अध्यक्ष योगेश गंगवाल यांच्या वतीने करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी आ.आशुतोष काळे यांच्या संपर्क कार्यालयाशी दिव्यांग बांधवांनी व त्यांच्या पालकांनी संपर्क करावा.