शेवगावात शिवजयंती सोहळा अनेक कारणानी संस्मरणीय ठरला

शेवगाव प्रतिनिधी, दि.२९ :  हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा नुकताच सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला. शेवगावातही तो त्याच दिमाखात पार पडला. मात्र, या वर्षीचा येथील सोहळा अनेक कारणानी संस्मरणीय ठरला आहे.

सार्वजनिक शिव जयंती समारोह समितीने तब्बल चार दिवस विविध वैशिष्टय पूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले. सर्व समाजाला बरोबर घेऊन आपली  संस्कृती जपत, अत्यंत शांततेत संयमशिल वातावरणात हा सोहळा पार पाडल्याच्या प्रतिक्रिया सर्व स्तरातून व्यक्त होत आहेत. यावेळी सर्व जातीधर्माचे  तसेच विविध राजकीय पक्षाचे लोक मतभेद विसरुन एकत्र आले. चार दिवस झालेल्या विविध कार्यक्रमात सार्वजनिक जयंती उत्सव समितीने सर्वासाठी सर्वकाही देण्याचा प्रयत्न केल्याचे प्रतित झाले.

पर्यावरणाची बूज राखत डिजे व डोळे दिपवणाऱ्या लेझर शोला फाटा – विशेष म्हणजे चार दिवसाच्या भरगच्च कार्यक्रमात कोठेही डिजेचा दणदणाट झाला नाही. भव्य शोभा यात्रा, मिरवणुका निघाल्या त्यात कधीही डोळे दिपवणारा आणि शरिराला त्रासदायक अशी लेझर शो ची प्रकाश योजना नव्हती.

पारंपारिक वाद्य व सुमधुर संगितावर गाणीही झाली दर्जेदार- उत्सव समितीने मिरवणुकीसाठी पारंपारिक वाद्ये लावली त्यावर लावण्यात आलेली गाणीही अभिरुची संपन्न होती. समिती सदस्यांनी ती अगोदर ऐकून निवडली होती. त्यामुळे यंदाचा शिवजयंती सोहळा अद्वितीय व संस्मरणीय ठरला आहे.

सर्व शैक्षणिक संस्थाचा सहभाग- शहरातील सर्व शैक्षणिक संस्थातील बालगोपाळांनी पहिल्या दिवशी शहरातून भव्य शोभायात्रा काढून मल्लखांबावरील  विविध प्रात्यक्षिके प्रदर्शित करीत शिस्तबद्ध भव्य शोभायात्रा काढल्या. संत महंताच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्याचे पूजन करून महाआरत्या करण्यात आल्या. स्थानिक वारकरी शिक्षण संस्थेची भजनी पथके व आळंदी संस्थानातील मुलींच्या डावांनी वेगळी रंगत आणली.

शिव स्मारक समितीचा महा अभिषेक व महाआरती सर्व धर्मीयांच्या उपस्थितीत – शेवगावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येथील शिवस्मारक समितीच्यावतीने पूर्णत्वाच्या मार्गावर असलेल्या अति भव्य ३८ फुट उंचीच्या दगडी किल्यासमोर १२ फुट उंचीचा छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा असलेल्या सुमारे दीड कोटी रु.खर्चाच्या उभारण्यात येणाऱ्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ च्या वतीने आयोजित महाअभिषेक व महाआरती उपक्रम सर्व धर्मातील व विविध राजकाय पक्षातील धुरीनाच्या उपस्थित पार पडला. हा सोहळा अतिशय सौहार्दपूर्ण झाला.

रक्तदान महादान – सार्वजनिक शिव जयंती उत्सव समिती, लोकमान्य हॉस्पिटल व रोटरीच्या वतीने शेवगावात आठ वर्षापासून सातत्याने राबवीण्यात येत असलेल्या रक्तदान शिबिरात शहरातील सर्व प्रमुख डॉक्टर व महिलांनी सक्तरानासाठी उत्स्फूर्त सहभाग घेऊन १०१ पिशव्या रक्त संकलन केले.

कबड्डी स्पर्धा व जंगी कुस्त्याचा फड गाजला – महानगरात रात्री विद्यूत प्रकाशात होणाऱ्या विविध मैदानी स्पर्धांचा थराराच्या धर्तीवर शेवगावकराना उत्सव समितीने आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धा व कुस्त्याचा जंगी आखाडा पहातांना अबालवृद्धाच्या डोळ्याचे पारणे फिटले. कबड्डी स्पर्धेसाठी राज्यभरातून ४० संघ आले होते. तर कुस्त्यांच्या जंगी फडासाठी देशभरातून नामांकित पैलवान मंडळी येथे आली. त्यांनी लाखोंच्या बक्षिसाची लयलूट केली.

कार्यकर्त्यानी आपला नामोल्लेख कटाक्षाने टाळला – सार्वत्रिक शिव जयंती समारोह व शिवस्मारक समितीने शेवगावात चार दिवस असे एकापेक्षा एक सरस कार्यक्रम पार पडले. त्यासाठी समितीच्या मावळ्यांनी अनेक दिवस खस्ता घेऊन उत्तम नियोजन करून सर्व सोहळे यथासांग पार पाडले. तरीही  कार्यकर्त्यांनी कधी माध्यमासी संपर्क साधून आपल्या नावाचा उल्लेख केला नाही.

उलट कोणाही कार्यकर्त्याचे नावाचा उल्लेख कृपा करून टाळावा अशी विनंती या कार्यकर्त्यानी माध्यमांच्या प्रतिनिधीकडे केली होती. एरव्ही अनेक ठिकाणी काहीही न करता नावाच्या उल्लेखासाठी अटापिटा होत असतो. या पार्श्वर्भूमिवर समितीच्या कार्यकर्त्याची ही भूमिका निश्चीतच वाखाणण्या सारखी आहे.