माळी समाज आ.आशुतोष काळेंच्या पाठीशी – पद्माकांत कुदळे

काळे परिवाराकडून माळी समाजाला नेहमीच भरीव सहकार्य

कोपरगाव  :- माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे तसेच माजी आमदार अशोकराव काळे यांनी माळी समाजाला भरीव  सहकार्य करतांना माळी बोर्डींगसाठी मदत केलेली होती. तोच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन काळे परिवाराचा वारसा पुढे चालवतांना आ.आशुतोष काळे यांनी देखील मतदार संघातील प्रत्येक  समाजाला विकासाच्या प्रवाहात सामावून घेतांना प्रत्येक समाजाच्या विकासासाठी सहकार्य केले आहे.

त्याप्रमाणे काळे परिवाराकडून माळी समाजाला देखील नेहमीच भरीव सहकार्य मिळाले असून मतदार संघातील इतर समाजाबरोबरच माळी समाज आशुतोष काळेंच्या पाठीशी आहे. त्यामुळे २३ तारखेला होणारा त्यांचा विजय ऐतिहसिक विजय राहणार असल्याचे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे यांनी केले आहे.

आ. आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ कोपरगाव शहरात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत माळी समाज बांधवांशी वार्तालाप करतांना ते बोलत होते. ते म्हणाले की, मतदार संघातील जनतेने दिलेल्या जनसेवेच्या संधीतून विकासाच्या बाबतीत मतदार संघाचा कायापालट करतांना मागील चार वर्षात सर्व समाजाला समान न्याय देवून समाजाभिमुख विकास करतांना आ. आशुतोष काळे यांनी एकही समाज मागे ठेवला नाही. 

विकासाभीमुख दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून मतदार संघाचा सर्वांगीण विकास करून मतदार संघातील रस्ते, वीज, पाणी प्रश्न आदी कामांबरोबरच विविध समाजाकरीता निधी देऊन कुठलाही समाज विकासाच्या बाबतीत मागे राहणार नाही याची काळजी घेतली आहे.

कोणत्याही समाजाच्या कार्यकर्त्यांना किंवा नागरिकांना विकासाचे प्रश्न त्यांच्याकडे न घेवून जाता देखील त्यांनी सोडविले आहे. त्यांच्याकडे मतदार संघाच्या विकासाची दूरदृष्टी असल्यामुळे मतदार संघाच्या विकासाचे प्रश्न त्यांना अवगत होते व सोडवायचे कसे यासाठी आवश्यक असलेली कुशाग्र बुद्धी देखील आहे. त्यामुळे त्यांनी  ‘सासवड माळीसभा बोर्डिंगच्या’ नूतनीकरण कामासाठी न मागता दहा लाख रुपये निधी दिला आहे. या निधीतून नुतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. भविष्यात अधिक निधीची गरज भासल्यास त्यासाठी सुद्धा त्यांची तयारी आहे.

त्यामुळे माळी समाजाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या आ. आशुतोष काळे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा व मतदार संघाच्या विकासाचे प्रलंबित राहिलेले प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठविण्याचा इतर समाजाचा बरोबरच माळी समाजाचा देखील मनोदय असल्याचे माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे यांनी यावेळी सांगितले.