४ वर्षापासून नुकसान भरपाई रखडली, २५ जानेवारीला बेमुदत उपोषणचा इशारा

शेवगाव प्रतिनिधी, दि. १ : तब्बल चार वर्षापूर्वी शेवगावातील नद्यांना आलेल्या पूराने तालुक्याच्या १३ गावातील शेतकऱ्यासह अनेकांचे संसार उध्वात होऊन भयंकर नुकसान झाले. अनेकांच्या घरात पाणी शिरून घरातील अन्नधान्यासह संसार वाहून गेला. घरांची पडझड झाली. नदीकाठच्या शेतात पाणी घुससल्याने विहिरी पडल्या, पिकासह माती वाहून गेली. खळवाडीत, शेतातील गोठ्यात असलेल्या शेळ्या, मेंढ्य गुरे ढोरे, कोंबड्या वाहून गेल्या. व्यावसायिकांच्या दुकानातील माल, फर्निचर वाहून गेले. जीवाभावाच्या लोकांचा संपर्क तुटला. सर्वत्र अहःकार  उडाला. पूर ओसरताक्षणीच नेहमीप्रमाणे व्हायचे तेच झाले. विविध कार्यकर्त्यांनी आपत्कालीन नुकसान भरपाईची मागणी केली.

पुढारी आले, दौरे झाले, मदतीच्या आश्वासनाची खैरात झाली. याबाबत महसूल, कृषी, सार्वजनिक बांधकाम, पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त पंचनाम्यानुसार विभागीय आयुक्तांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे  कोट्या वधीचे अनुदान वर्ग करण्याचा अहवाल सादर करण्यात आला.
झालेल्या नुकसानीच्या प्रकारनुसार मदतीच्या कोट्यावधीची आकडेवारी जाहीर झाली. काहींना मिळाली ते नशीबवान ठरले. राहिलेल्यासाठी हाडाचे कार्यकर्ते आजही अधून मधून  नुकसान भरपाईची मागणी करत आहेत. मात्र आजही अनेक जण नुसतानीच्या लाभापासून वंचित आहेत ही वस्तुस्थिती आहे.

तालुक्यातील दोन्ही आखेगाव, खरडगाव, दोन्ही वरुर, भगूर, शेवगाव, दोन्ही वडुले, जोहरापूर, कांबी हादगाव, गायकवाड जळगाव या गावातील अनेकांना मदतीने हुलकावनी दिल्याने आज मंगळवारी येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे कॉम्रेड संजय नांगरे, रामकिसन कराड, भाऊ बैरागी, अपंग संघटनेचे चांद शेख आदी कार्यकर्त्यांनी तहसीलदार प्रशांत सांगडे यांना लेखी निवेदन देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. अन्यथा येत्या प्रजासत्ताक दिनाअगोदर पूर्वसंध्येला २५ जानेवारीला बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

निवेदनाची दखल घेऊन तहसीलदार सांगडे यांनी मंगळवारी तहसील कार्यालयात पार पडलेल्या समन्वय बैठकीत तातडीने विविध गावातील  ५६ शेतकऱ्यांना त्यांच्या अन्नधान्य व संसार उपयोगी साहित्याची नुकसान भरपाईची रक्कम येत्या दोन दिवसात वितरीत करण्याचे तसेच नुकसान भरपाईचे पंचनामे दोन दिवसा पूर्वो  प्राप्त झाल्याने याबाबत विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार पुढील कार्यवाही करण्याचे मान्य केले.      

मध्यंतरीच्या चार वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. सध्या त्यावेळी झालेले पंचनामे तसेच संपूर्ण नुकसानीच्या तपशिलाचा डेटाच उडाला असल्याच्याही येथे जोरदार चर्चा आहेत.  कार्यकर्त्याच्या त्याबद्दल तक्रारी आहेत. पंचनामे उपलब्ध नसल्याच्या सबबी अनेकदा सांगणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य म्हणून वेळोवेळी होणाऱ्या मागण्याच्या वेळी त्यांचा शोध कां घेतला नाही? असा कार्यकर्त्यांचा प्रश्न ही अनुत्तरीत आहे.