कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर व गौतम पब्लिक स्कूल गौतमनगर यांच्या संयुक्त विद्यमाने २५ नोव्हेंबर रोजी गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी मैदानावर शालेय विभागीय हॉकी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पुणे विभागातील सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यातील मुला-मुलींचे एकूण आठ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या १४ वर्षाखालील हॉकी संघाने वर्चस्व राखत उपांत्य सामन्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका संघाचा ६-० असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

सदर संघाने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुणे ग्रामीण संघाचा ३-० असा पराभव करून विजेतेपद पटकावले. मुलींच्या अंतिम सामन्यात अहिल्यानगर ग्रामीण संघाने पुणे शहर संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. गौतम पब्लिक स्कूलचा विजेता हॉकी संघ गौतम पब्लिक स्कूल येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत पुणे विभागाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली.

स्पर्धेचे उद्घाटन सकाळ वृत्तसमूहाचे ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सकाळ वृत्त समूहाचे मॅनेजर सचिन देशमुख, पत्रकार सतीश वैजापूरकर, संस्था इन्स्पेक्टर नारायण बारे, शाळेचे प्राचार्य नूर शेख तसेच पुणे विभागातील सर्व मुला मुलींचे संघ, व्यवस्थापक, प्रशिक्षक मोठ्या संख्येने हजर होते. संस्थेचे अध्यक्ष मा.आ.अशोकराव काळे, संस्था विश्वस्त असलेले कोपरगाव तालुक्याचे आ.आशुतोष काळे, संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे, सर्व संस्था सदस्य, निरीक्षक नारायण बारे, प्राचार्य नूर शेख आदींनी गौतम पब्लिक स्कूलच्या विजेते हॉकी संघाचे अभिनंदन करून राज्यस्तरासाठी शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, हॉलीबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव, सर्व हाउस मास्टर्स, कॅम्पस सुपरवायझर सुनील सूर्यवंशी, मेस विभाग प्रमुख त्रिंबक वर्पे, अशोक कंक्राळे आदींनी काम पाहिले. पंच म्हणून अकबर खान, जावेद शेख, समीर शेख व प्रिन्स कुमार यांनी काम पाहिले. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन उत्तम सोनवणे व आभार हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे यांनी मानले.

पुढील महिन्यामध्ये गौतम स्कूलच्या प्रशस्त राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेत राज्याच्या आठ विभागातून खेळाडू येणार असून यामध्ये मुलांचे आठ आणि मुलींचे आठ संघ सहभागी होणार आहे. या खेळाडूंसाठी गौतम पब्लिक स्कूलने उत्कृष्ट व्यवस्था व नियोजन केले असून खेळाडूंना उच्च द्रजाचे मैदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धा गौतम पब्लिक मध्ये पार पडतात हि आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असून येणाऱ्या खेळाडूंची राहण्याची आणि जेवणाची उत्तम सुविधा केली जाणार आहे.- सौ.चैतालीताई काळे.


