शेवगाव प्रतिनिधी, दि. ३ : तालुक्यातील नवीन दहिफळच्या नानाविध अडचणी मार्गी लावण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्नाची शिकस्त केली. मात्र त्याचे फलित मिळाले नाही. म्हणून आतापर्यंत वेळोवेळी केलेल्या मागण्या, निवेदने, त्यासाठी केलेल्या उपोषणाबाबतचे प्रश्नांची शिदोरी दिवाळीचा फराळ म्हणून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थानी घेऊन जाण्याची भन्नाट आयडीया गावातील बाळासाहेब सदाशिव शिंदे या तरुण कार्यकत्र्याने काढली आहे. मंगळवारी ( दि.१ ) त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तसे निवेदन दिले आहे.
नवीन दहिफळ हे पुनर्वसीत गाव असून या गावातील शिव रस्ते , तसेच पाणंद रस्ते हे अत्यंत खराब झालेले आहेत . गावातील रस्त्यांचा प्रलंबित प्रश्न देखील प्रशासनाने सोडवलेला नाही. विशेष म्हणजे गाव पुनर्वसीत असून देखील कोणत्याही मूलभूत सुविधेचा लाभ येथील ग्रामस्थांना मिळालेला नाही. दिनांक १४ ऑक्टोबर २०२२ रोजी रस्त्याच्या संदर्भात ग्रामस्थांनी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना दिवाळी सणाच्या निमित्ताने तरी ही कामे मार्गी लावण्याबाबत निवेदने दिली. त्याचबरोबर मुख्यमंत्री ,अहमदनगर दक्षिणचे खासदार, शेवगाव पाथर्डीचे आमदार यांनाही निवेदने दिली.
निवेदनासोबत विविध माध्यमांतून गावातील प्रलंबित प्रश्नांविषयीच्या प्रसारित झालेल्या बातम्या पाठवून वस्तुस्थिती सर्वांपुढे मांडली. मात्र कोणीही त्याची दखल घेतली नाही. दिवाळी सणानिमित्त प्रशासन रस्त्याच्या प्रश्नाकडे गंभीरतेने पाहील अशा आशेने ग्रामस्थांनी दिवाळी सण हा अक्षरश: रस्त्यावर साजरा केला. मात्र झोपलेले हे सरकार आणि प्रशासन ढम्म राहिले. ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदना संदर्भात प्रशासनाकडून ग्रामस्थांना चार ओळीचे साधे उत्तरही दिले गेले नाही.
म्हणूनच दिनांक ८ नोव्हेंबर २०२२ रोजी तुळशी विवाह दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी मुंबईला हे सर्व बाड त्यांना दाखविण्यासाठी घेऊन जाणार असल्याचे निवेदनात नमूद केलेले आहे. जनतेला नुकतेच मुख्यमंत्री म्हणून सर्वसामान्याचे प्रतिनिधी लाभले आहेत आणि सर्वसामान्यांचे प्रश्न हे सर्वसामान्य व्यक्ती समजू शकते अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे. असेही बाळासाहेब शिंदे यांनी शेवटी नमुद केले आहे.
मुख्यमंत्र्यांना जनतेच्या प्रश्नांची शिदोरी १)वाढती महागाई २) बेरोजगारी ३)जीवनावश्यक खाद्यपदार्थ वरील जी.एस.टी ४)अनुसूचित जाती जमाती भटका समाज यांच्या समस्या ५) दिव्यांग ,निराधार ,वृद्ध, विधवाच्या समस्या ६) ग्रामीण भागातील मूलभूत गरजा ७)शेतीमालावरील निर्यात बंदी ८)नैसर्गिक आपत्तीतील शेतकऱ्यांच्या अक्रोशाबाबत ९)भारतातील सार्वत्रिक निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याबाबत १०)शहरी भागातील ट्राफिक जाम समस्येबाबत याही प्रश्नांचा शिदोरीमध्ये समावेश आहें