कोल्हे साखर कारखाना कार्यस्थळावर रस्ता सुरक्षा अभियान संपन्न 

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ९ : संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यातील प्रत्येक घटकाबरोबरच संजीवनी परिवाराच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य दिले असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले.

            ते पुढे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या विचारातुनच कारखान्याचे प्रत्येक घटकासाठी वाटचाल आम्ही करत आहोत. तसेच उस वाहतुक करतांना सर्व घटकांनी आपल्याबरोबरच इतरांच्या सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून वाहतुक करावी, तसेच शासकीय अधिका-यांनी रस्ते व वाहतुक सुरक्षीतताबाबत मार्गदर्शन घेवून सुरळीतपणे वाहतुक करावी व संजीवनी परिसरातील घटक संस्थांचे कार्य विचारात घेवुन सर्वानीच या सुरक्षा अभियानास सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन करून सभासद शेतकरी कामगार उसतोडणी मजुर, उस वाहतुकदार आदिच्या सुरक्षेसाठी कारखान्यांने उतरविलेल्या विमा योजनांची माहिती देवून संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी आजवर केलेल्या कार्याचा आढावाही विवेक कोल्हे यांनी घेतला.

              सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर प्रादेशिक परिवहन विभाग श्रीरामुपर, कोपरगांव शहर व ग्रामिण पोलिस स्टेशन व संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने शुक्रवारी कारखाना कार्यस्थळावर उस वाहतुक करणा-या बैलगाडया, ट्रक व ट्रॅक्टर वाहनांना रिफक्लेटर लावण्याचा शुभारंभ अध्यक्ष विवेक कोल्हे, मोटार वाहन निरीक्षक सुनिल गोसावी, पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.

              प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी प्रास्तविक केले. केन मॅनेजर जी. बी. शिंदे यांनी उसतोडणी मजुर, वाहतुक करणारे चालक मालक यांच्यासाठी कारखान्याने उतरविलेल्या गन्ना कामगार अपघात विमा योजनेची माहिती दिली तर अमृत व सुवर्ण संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनी अंतर्गत उस वाहतुकदारांना दिल्या जाणा-या सुविधांची माहिती अध्यक्ष पराग संधान यांनी दिली.

            मोटार वाहन निरीक्षक सुनिल गोसावी म्हणाले की, रात्री अपरात्री उस वाहतुक करू नये, बैलांना तसेच ट्रक्स, ट्रॅक्टर ट्रॉली आदि उस वाहतुकीच्या वाहनांना रेडीयम पटटया लावुनच रस्त्यावरून त्याची वाहतुक करावी. सलग ओळीने बैलगाडया रस्त्याने चालवु नये, वाहनावर कर्णकर्कश आवाजात गाणे लावुन वाहतुक करू नये असे स्पिकर्स आढळून आल्यास ते जप्त करून चालक व मालक दोघांनाही दंडाची आकारणी होईल, नादुरूस्त वाहने रस्त्यात लावुन काम करू नये, रिफक्लेंटर रेडीयम पटटया झाकु नये, सुरक्षीत वाहतुकीस चालकांनी सहकार्य करावे. 

           पोलिस दौलतराव जाधव  म्हणाले की, आपली सुरक्षा आपल्याच हातात असते,वाहन चालवितांना भ्रमणध्वनीवर बोलू नये, मद्यसेवन करून वाहन चालवू नये, चालकांच्या अंतर्गत वादाचा फटका साखर कारखानदाराबरोबरच मालकांना होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी.

          याप्रसंगी संचालक सर्वश्री निवृत्ती बनकर, बापूराव बारहाते, रमेश आभाळे, सतिष आव्हाड, बाळासाहेब पानगव्हाणे, संजय औताडे, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, गोपी गायकवाड, बापूराव औताडे, उपशेतकी अधिकारी सी एन वल्टे, सुरक्षा अधिकारी रमेश डांगे, देवकर यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी संचालक, पदाधिकारी, खातेप्रमुख, उपखाते प्रमुख, उस वाहतुकदार चालक मालक आदि उपस्थित होते. अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान यांनी आभार मानले, सुत्रसंचलन केशव होन, दिपक जगताप यांनी केले.