शेवगाव प्रतिनिधी, दि. १७ : शेवगाव तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो यांनी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल उधळलेल्या मुक्ताफळांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात येवून येथील क्रांती चौकात त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे आज दहन करण्यात आले.
यावेळी पाकिस्तान सरकारचाही तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. यावेळी भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद, हम सब एक है , हम से जो टकराऐगा, मिट्टी में मिल जायेंगा । अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेले बिलावल भुत्तो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल सर्व प्रकारच्या मर्यादा पार करून मुक्ताफळे उधळली आहेत.
याबाबत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष (दक्षिण) अरुण मुंढे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी शहरातील क्रांती चौकात आंदोलन करण्यात आले. भाजपचे तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, रवींद्र सुरवसे, भीमराज सागडे, भाजपचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गुरुनाथ माळवदे, विनोद मोहिते, माजी नगरसेवक अंकुश कुसळकर, दिगंबर काथवटे, गणेश कोरडे, डॉ.निरज लांडे पाटील, जगदीश धूत, अशोक गाढे, मुसाभाई शेख, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख आशुतोष डहाळे, रामकिसन महाराज तापडिया, कल्याण जगदाळे, अमोल काटे, अशोक ससाणे, अर्जुन ढाकणे, उमेश धस, मंगेश पाखरे, गणेश जायभाये, संदीप लांडगे, विशाल परदेशी, संजय लहासे आदींसह तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.