राजकीय हस्तक्षेप झाल्याचा होतोय आरोप
शेवगाव प्रतिनिधी, दि. १७ : अहमदनगर जिल्हा परिषद अंतर्गत जलजीवन मिशन योजनेच्या कामाच्या निवीदा प्रक्रियेमध्ये अनियमितता झाली असून यात राजकीय हस्तक्षेप होऊन ही निविदा ठराविक ठेकेदारांनी आपसात वाटप करून घेतली असल्याचा आरोप करून त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार व इतर छोट्या ठेकेदारांवर अन्याय झाला असल्याने ती रद्द करावी अशी मागणी मनसेचे तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जलजीवन मिशन योजनेच्या कामाच्या कोट्यावधी रुपयाच्या निविदा नुकत्याच काढण्यात आल्या आहेत. या योजनेच्या कोट्यावधी रुपयाच्या कामाचे वाटप ठराविक ठेकेदारांनाच करण्यात आले आहे. त्यासाठी येथे राजकीय हस्तक्षेप झाला आहे. असा दावा करुन ही निविदा प्रक्रीया अन्यायकारक असल्याने ती रद्द करावी अशी त्यांची मागणी आहे.
याच योजनेच्या कामात सोलापूर, हिंगोली, बीड जिल्ह्यात देखील अनियमीतता आढळून आली असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक ठिकाणी जल जीवन मिशन योजनेच्या निविदा रद्द करून कामांना स्थगिती दिली होती. असे निवेदनात नमूद करुन त्याच धर्तीवर येथेही तशी स्थगिती द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.