संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा व्हॉलीबॉल संघ प्रथम

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २४ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत अहमदनगर जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने अहमदनगर येथे घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन मुलींच्या व्हालीबॉल सामान्यांमध्ये संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघाने  प्रथम विजेते पद जिंकून क्रीडा क्षेत्रातही विजयी पताका कायम ठेवली, अशी  माहिती संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रसिध्दी पत्रकात दिली आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की अहमदनगर जिल्ह्यातील  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अखत्यारीतील विविध वरिष्ठ  महाविद्यालये, अभियंत्रिकी महाविद्यालये, फार्मसी महाविद्यालये, अशा  विविध महाविद्यालयांमधिल एकुण १५ संघांनी या जिल्हास्तरीय मुलींच्या व्हॉलीबॉल सामन्यांमध्ये सहभाग नोंदविला. अंतिम सामन्यात संजीवनीच्या संघाने एस.एस.जी.एम. कॉलेज, कोपरगांवच्या संघावर २-० सेटने विजय मिळविला, व जिल्ह्यात  अव्वल असल्याचे सिध्द केले.

या संघामध्ये साईशा  अंबोरे, समिक्षा बाविसकर, दिशा  चंद्रे, ऋतुजा घनघाव,हर्षदा  दराडे, दर्शना  नागरे, उन्नती अव्हाड व ऋतुजा दरपेल यांनी उत्कृष्ट  खेळाचे प्रदर्शन केले. सर्व अहमदनगर जिल्ह्यातील  खेळाडूंमधुन विभागीय सामन्यांसाठी संपुर्ण अहमदनगर जिल्ह्याचा  एक संघ निवडण्यात आला. यात संजीवनीच्या साईशा, समिक्षा व ऋतुजा या तीन खेळाडूंचा समावेश  आहे.

संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शैक्षणिक  बाबींबरोबरच खेळालाही तितकेच महत्व दिल्या जात असल्यामुळे जिल्ह्यात  अनेक आर्टस, कॉमर्स व सायन्स सारख्या पारंपारीक शिक्षण देणाऱ्या  संस्था असताना देखिल संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने या स्पर्धामध्ये बाजी मारली. या सर्व खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा. गणेश  नरोडे व प्रा. शिवराज पाळणे यांचे मार्गदर्शन  लाभले.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष निततीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच अमित कोल्हे यांनी छोटेखानी कार्यक्रमात सर्व यशस्वी खेळाडूंचा सत्कार केला. यावेळी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर उपस्थित होते.